Thursday, May 12, 2016

चिखलातला नंदी काढायचा कोणी?

एकदा भगवान शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते.  देवी पार्वतीचे लक्ष एका छोटयाशा गावावर खिळले होते, देवी खूप सूक्ष्म निरीक्षण करत होती. भगवान शंकर स्मित हास्य करीत देवी पार्वतीकडे पहात होते. देवीला त्या गावामध्ये कमालीची विषमता दिसत होती काही लोक खूप श्रीमंत होते, काही उच्च मध्यमवर्गीय तर काही कनिष्ट मध्यमवर्गात मोडणारे लोक होते. कनिष्ट मध्यमवर्गीय लोक आपले जीवन जगताना त्रासिक कसरत करत होते. जीवनावश्यक मुलभूत गरजा पुरवतानाही त्यांच्या नाकी नऊ  येत होते,  या सर्वांच्या हाताखाली राबणारे काही गरीब लोक होते ते मात्र खूप हालअपेष्टा सोसत जीवन कंठत होते. हे सर्व पाहून देवीला ही विषमता नष्ट व्हावी असे वाटू लागले.

देवीने ही  विषमता नष्ट करण्याची आणि सर्व लोकांना सर्वसुखी आणि श्रीमंत करण्याची विनंती महादेवाना केली परंतु हे प्रकृतीच्या विरुद्ध होईल म्हणून महादेवांनी या मागणीस मनाई केली. पण देवीने हट्टाला पेटून ही तिची विनंती मान्य करून घेतली.

महादेवानीही  'तथास्तु' म्हणून त्या गावाचा क्षणार्धात कायापालट केला. आता या गावात काही झोपड्या ऐवजी सर्वठिकाणी टुमदार वाडे दिसत होते. अंगावर भरजरी कपडे आणि दाग - दागिने घातलेले लोक मिरवत होते. प्रत्येकाला खायला पंच-पक्वान होते, बाहेर येण्या-जाण्यासाठी सर्वांच्या दारात टांगे उभे होते. एशोआरामात जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा होत्या तरीही कोणत्यातरी गोष्टीची कमतरता देवी पार्वतीला भासत होती.

देवीने पुन्हा या कमतरतेचा शोध लावण्याची विनंती महादेवाना केली, ही विनंती महादेवांनी लगेच मान्य केली आणि त्या कमतरतेचा शोध लावण्यासाठी स्वत: या गावाला भेट देण्याचे ठरवले. म्हणून महादेवानी त्यांचा अतिप्रिय भक्त नंदीला सोबत घेतले आणि  एका शेतकऱ्याच्या रुपामध्ये या गावात दाखल झाले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक पणे एका चिखल असलेल्या खड्ड्यात नंदी अडकला. नंदीला बाहेर काढणे आवश्यक होते म्हणून त्या शेतकऱ्याने जवळच एका टुमदार वाडयाचा दरवाजा ठोठावला, आतून एका श्रीमंत व्यक्तीने  दरवाजा उघडला आणि काय पाहिजे? अस त्रासिक मुद्रेने विचारले. शेतकऱ्याने गावच्या हद्दीजवळ आपला बैल चिखलात अडकला असून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली, पण त्या शेतकऱ्याचे बोलणे पूर्ण होण्याआधी त्या श्रीमंत व्यक्तीने सोन्याच्या मोहरांची एक थैली त्याच्या हातात दिली आणि  काही लोकांना या मोहरा देऊन त्या मोबदल्यात आपला बैल बाहेर काढ असा सल्ला दिला आणि त्याने आपला दरवाजा बंद केला.  

शेतकरी आता पुढच्या घरात मदत मिळेल या आशेने पूर्ण गाव फिरून आला मात्र कोणीही श्रमदान केले नाही. प्रत्येकाने आर्थिक मदत देऊ केली, पण बैल बाहेर काढण्यासाठी त्या शेतकऱ्याला दोन-तीन लोकांची गरज होती, या गावाच्या जवळपास दुसरे कोणतेही गाव नव्हते त्यामुळे वेळेत मदत मिळणे गरजेचे होते. त्यामुळे महादेवानी आपला नंदी स्वतःच  चिखलातून बाहेर काढला, आणि कैलास पर्वतावर परतले. महादेवानी कायापालट केलेल्या या गावात सर्वच लोक श्रीमंत झाले होते त्यामुळे त्यांना कोणी नोकर मिळत नसे अशाने लोक आपली काम फक्त आपणच करत होते दुसऱ्याच्या कामाला कोणी हात लावत नव्हते. आपोआपच सर्वांमध्ये स्वार्थीपणा निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या स्वभावात राग, द्वेष  आणि मत्सर वाढला होता. या गावच्या लोकांमधून माणुसकी हरवली होती.  हे सर्व देवी पार्वतीला जाणवले होते म्हणून या गावाला जसे होते तसे करण्याची विनंती केली. आणि महादेवानी 'तथास्तु' म्हणून ती मान्य केली.

महादेवानी देवी पार्वतीला सांगितले ' जेव्हा निसर्गनियम मोडून एखाद्या गोष्टीची खूप मोठी प्रगती होते ती तकलादू असते, मानवी स्वभाव तर खूप लवचिक आहे त्यामुळे त्यांनी आपला उद्धार आपल्या प्रयत्नाच्या जोरावर  करावा आणि माणुसकी हे मानवी स्वभावाचे मुलभूत अंग आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नये. अन्यथा 'चिखलातला नंदी काढायचा कोणी? अशी अवस्था होते

1 comment: