Monday, August 24, 2015

दोन पहाड

बिहार मध्ये गया जिल्हयात गेहलोर या मागासलेल्या एका छोट्या गावात एक सामान्य माणूस एकटा डोंगर पोखरुन आपल्या गावासाठी रस्ता तयार करायच ठरवतो आणि एक मोठी संघर्षयात्रा सुरु होते . आपल्या पत्नीचा जीव ज्या पर्वतावर पाय घसरुन गेला त्या पर्वताचा भेद करुन एक रस्ता तयार करण्याचा निश्चय करतो ज्यामुळे हजारो लोकांना पर्वताला परिक्रमा घालताना होणारा त्रास कमी होईल ही जनोपयोगी भावना.

नाव दशरथ मांझी ३६८ फुट लांब आणि २५ फुट रुंद रस्ता बनविन्याचा विडा उचलल्या सारखा दोन हाथ करायला सुरुवात करतो आणि २२ वर्ष हा व्यक्ति आपल्या श्रमाने आणि क्लूप्तिने या पर्वताचा भेद करतो. पण इतकी साधी आणि सोपी गोष्ट असेल का हो ही! दुष्काळ आणि सतराशे साठ विघ्न याना तोंड देत हा तपस्वी पर्वताला स्वतच दिलेले आव्हान पूर्ण करतो. हा संघर्ष उत्तमरीत्या मांझी या चित्रपटात दाखवला आहे.
दशरथ मांझीने हातात घेतलेले काम आणि २२ वर्षे शारीरिक कष्ट आणि येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडु शकले असते आणि पर्वत फोडून रस्ता तयार करण्याचे आव्हान कधीच संपुष्टात आले असते, पण स्वतःच्या २५ पट जास्त वजन उचलु पाहणाऱ्या प्रयत्नवादी मुंगी कडून प्रेरणा घेतल्यासारखी पराकष्टा करुन रस्ता तयार केला.

२००७ मध्ये दिल्ली येथे एका रुग्णालयात कैंसरशी झुंज देत शेवटचा श्वास घेतला. राजकिय उदसिनतेमुळे गेहलोर गावासाठी पक्का रस्ता त्यांच्या मृत्युनंतर ४ वर्षानी तयार झाला.दशरथ मांझीच्या मिडिया वरील एका मुलाखती मध्ये ते म्हणतात जोपर्यंत ही पृथ्वी आहे तो पर्यन्त हा रस्ता राहील. एका पहाडाशी दुसऱ्या पहाडा एवडया व्यक्तिमत्वाने घेतलेली मैत्रीपूर्ण झुंज म्हणजे सकारात्मकतेची गाथा झाली.

Saturday, April 25, 2015

आपली शाळा


आमची चौथी' पर्यंतची प्राथमिक शाळा म्हणजे 'जीवन शिक्षविद्या मंदिरहे शाळेचे नाव मला आजही सुंदर वाटते, मारुतीच्या मंदिरात भरणाऱ्या बालवाडीतून आमची रवानगी प्राथमिक शाळेत झाली. मोजके शिक्षक आणि शिक्षिका असणाऱ्या या शाळेत आम्ही काय शिकलो हे पूसटसं आठवते पण त्या शाळेतल्या शिक्षणाच्या दर्जाची मी कधीच खंत ठेवली नाही, त्यावेळी आमच्या गावात इंग्रजी शाळा यायला अजून दशकभराचा अवकाश होता. त्यामुळे प्राथमिक आणि पुढे माध्यमिक शिक्षण मराठीतून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

एक छोटे प्रवेशद्वार त्यावर शाळेचे नाव आणि कुंपणाच्या आतमध्ये अेल्युमिनिअमचे पत्रे असणाऱ्या भिंतीचे पाच वर्ग होते. सर्व शिक्षक आठवत नाहीत पण एक 'खान गुरुजी' म्हणून मुख्याध्यापक होते ते मात्र आजही आठवतात त्याला कारणही तसेच आहे, हे खान गुरुजी आमच्यादृष्टीने जगातला सर्वात मोठा माणूस होता कारण तोपर्यंत शाळा आणि घर हेच आमचं जग होत. नक्की आठवत नाही पण तिसरी किवा चौथीच्या एका चाचणी परीक्षेत ' भारताचे पंतप्रधान कोण ? असा प्रश्न होता त्यावर उत्तर म्हणून 'खान गुरुजी' हे नाव बहुमताने मंजूर झाल्यासारखे सर्व विध्यार्थ्यानी लिहिले आणि आमच्या वर्गशिक्षिकेने त्याचा राग आमच्यावर असा काढला होता कि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांचे नाव द्यायला हवे होते कि काय असे वाटले.      

चौथी पर्यंतच्या शाळेत दुध पिणे हे सर्व विध्यार्थ्यांसाठी बंधनकारक होते त्यामुळे आम्ही नाक बंद करून घटाघट ते  पिउन टाकत असू, त्यावेळी शाळेतले दुध पिणे हा आम्हाला सार्वजनिक अत्याचार वाटत असे त्यामुळे त्या बालवयात आमच्या मनात असंतोष मूळ धरू लागला होता, अशातच एकदा शाळेने 'गांधी टोपी' सर्वांसाठी अनिवार्य केली. आणि जवळ पास पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देत शाळेला सलग दोन दिवस दांडी मारली. शेवटी शाळेने नमते घेत गांधी टोपीचा निर्णय रद्द केला. आमच्या विरोधाला कारण होत कि मुली गांधी टोपी घातल्यावर आम्हाला हसतात.            

शाळेच्या कुंपणाबाहेर मीठ टाकलेल्या बोरांची आणि चिंचाची चव जिभेवरून मनावर उतरल्यासारखी अजूनही तशीच आहे. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत चौथीतल्या पुस्तकातले बाल शिवाजी आमच्याबरोबर मोठे झाले होते, त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. पण शाळा अजूनही तिथेच उभी होती, आजही आहे. तिथे कित्येक विद्यार्थी, शिक्षक येउन गेले असतील पण शाळेचे नाते कितीजणांनी जपले असेल माहित नाही.प्रत्येकाची शाळा थोडया फार फरकाने अशीच असू शकते. शिक्षणाचा श्रीगणेशा जिथून सुरु केला ती आपल्या प्रत्येकाची प्राथमिक शाळा असाधारण महत्वाची असते असे वाटते. कोणाला सुखवस्तूंच्या गर्दीतून कधी शाळेला भेट देता आली तर जरूर द्यावी कारण इथे येउन आपली सुरुवात आपण पुन्हा पाहू शकतो.     
    

Friday, April 24, 2015

रॉक्स - कोक स्टुडिओ


 राम संपथ, सोना मोहपात्रा आणि जस्मिन यांनी दिलेला धमाल संगीत पर्फ़ोमन्स 'कोक स्टुडिओ एम टी व्ही सिझन ३' आणि सत्यमेव जयते मधील एक गीत या सर्वांचे रॉक्स जरूर ऐका आणि पहासुद्धा, खालील दुव्यावर टिचकी द्या.  


पिया से नैना - सोना मोहपात्रा