Tuesday, December 9, 2014

तुळापूर

काही वर्षांपूर्वी आळंदीला एका लग्नासाठी गेलो होतो, लग्न लागण्याआधी ज्ञानेश्वर महारांजाच्या समाधीच दर्शन घेऊन आलो नंतर दुपारपर्यंत लग्नही पार पडले. आम्ही नऊ ते दहाजण लग्नासाठी जमलो होतो आमच्याजवळ बराच वेळ उरला होता तेवढ्यात एका मित्राने तुळापुरला जाऊन येऊया का ? अस विचारलं आणि जवळपास सर्वांनी होकार दिला, आणि आम्ही तुळापुरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. 

 तुळापुर पुण्यापासून अंदाजे ४० कि. मी. हे ठिकाण शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थानामुळे प्रसिद्ध आहे, शक्यतो बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेलही.  तुळापुरला जात असताना मला 'छावा' पुस्तक आणि संभाजी महाराजांचा इतिहास आठवायला लागला. जवळेक अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहचलो. समोर एक भव्य प्रवेशद्वार आहेत त्यावर संभाजी महाराजांचा वाघाचा जबडा फाडणारा पूर्णाकृती पुतळा आहे.  प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक बाग आहे आणि एका टोकाला संभाजी महाराज आणि कवि कलश यांच्या समाधी आहेत. समाधी समोर नमस्कार करून आम्ही भीमा नदी तीराकडे निघालो, तिथं थोडावेळ थांबलो आणि  नदीच्या पलीकडे गेलो तिथं छोट्या टेकडीवर आम्ही सर्वजन जाऊन बसलो, तिथूनच  काही अंतरावर दगडांचा मोठा चौथरा किवा तसलाच काहीतरी भाग होता पण तो किमान दहा - बारा गुंठ्यांचा भाग असावा . आमच्या मित्रांमधून कोणीतरी बोललं कि तेथे औरंगजेबाच्या छावण्या होत्या. पण माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत. त्यावेळेस माझ्या मनात बरेच विचार  येउन गेले.
संभाजी महाराजांना त्यांचे खूप हाल करून मारण्यात आलं त्यांचे डोळे काढले, जीभ कापली  आणि शिरच्छेद केला किती यातना झाल्या असतील कल्पना पण करवत नाही. मराठा साम्रज्याचा राजा असूनही त्यांच्या वाट्याला असल मरण आलं. त्यांचे शीर भाल्यामध्ये अडकवून नदीतीरावर ठेवलं शरीराचे तुकडे तुकडे करून फेकण्यात आले ते तुकडे गोळा करून जवळच्या गावातील लोकांनी भीमा नदीजवळ अंत्यसंस्कार केले, महाराजांचा मित्र कवि कलश यांचा शिरच्छेद केला. 

समाधी जवळ काही लोक आणि लहान मुलं फळविक्री करत बसली होती त्यांना  संभाजी महाराजांविषयी माहिती विचारली आणि जवळपास सर्वांनी एक प्रकारची माहिती सांगितली त्यामध्ये आणि इतिहासातल्या माहितीमध्ये बरेच साम्य होते. आमची निघायची वेळ झाली होती म्हणून आम्ही समाधी बाहेरच्या दिशेने चालू लागलो. माझं मन खिन्न झालं होत तिथल्या वातावरणात मला वेगळच उदासपण जाणवत होत. संभाजी महाराजांच्या धर्मनिष्टेला, सहनशिलतेला, आणि शुरत्वाला एक सलाम केला आणि निघालो परतीच्या प्रवासाकडे.






No comments:

Post a Comment