Monday, February 26, 2018

फटाक्यांचे पोस्टर

साधारण पंच्याऐशी ते नव्वद च्या दशकात माझं आणि समवयीन मित्रांचं फटाके हे दिवाळीतल मुख्य आकर्षण असायचे, आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या समोर मैदानात फटाक्यांची दुकानं लागलेली असायची. सुट्टी दहा बारा दिवस असायची त्यामुळे कधी किल्ला कर तर क्रिकेट खेळ असा आमचा दिवस जायचा मग संध्याकाळी आमचे पाय फटाक्यांच्या दुकानाकडे वळायचे.

एका दिवाळीत एकदाच फटाके मिळायचे तेही  मोजकेच त्यामुळे आम्हाला खुप वेळा फटाके दुरूनच  पाहून समाधान मानावे लागायचे, त्या दुकानात काही मोठे फटाके असणारे  बॉक्स असायचे त्या वर असणारे नट्याची पोस्टर माझं विशेष लक्ष वेधून घेत असत.त्यावेळी हिरोईन ला नटी शब्द जास्त वापरत असत,  पण त्या मध्ये अभिनेत्री श्रीदेवीचा फोटो माझ्या कायम लक्षात राहिला. गडद रंगाची साडी आणि गडद रंगाचं ते बॉक्स, हातात पणतीच ताट आणि तिच्या दोन्ही बाजूला उडणारे फुलबाजे आणि त्यातून तयार झालेल्या कित्येक चांदण्या, ते आणि तसले कित्येक पोस्टर माझ्या स्मरणात तसेच राहिले पुढे जाऊन ती चित्रपट सृष्टीत चांदणी या  चित्रपटात चमकली. नव्वद चा दशक संपून कित्यके अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण अजून ही  कित्येक फटाक्यांच्या बॉक्स वर श्रीदेवीच स्थान अजूनही अढळ आहे, काल वयाच्या ५४ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. एक बालकलाकार ते  एक सशक्त अभिनेत्री असं जेवढं  आयुष्य मिळालं ते एक कलाकार म्ह्णून जगलं, ते ही सुमारे ३०० चित्रपटात काम करून. गुगल वर खूप शोध घेतला पण ते पोस्टर मिळालं नाही पण त्याच्याशी मिळतं जुळतं एक पोस्टर इथे ठेवून या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रदांजली अर्पण करतो. 

Thursday, June 1, 2017

रंजस



मागचा लेख जुलै महिन्यात लिहला होता त्यानंतर एक वर्षांनी हा लेख लिहीत आहे, तर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात  पावसाची सुरुवात होते. म्हणजे  एखादे शहर, छोटे नगर किंवा खेडेगाव असो कि वाडी- वस्ती, पाऊस सुरवातीला सगळ्यांना सळो कि पळो करून सोडतो. पाऊस चांगला दोन आठवडे लागला कि बरेच लोक त्या पावसाळी वातावरणात रुळलेले असतात. लोकांचे वागणे- बोलणे त्या पावसाळी वातावरणाला साजेसे असते पण समाजात काही असे तरुण लोक असतात त्या पावसाने त्यांच्या चेहऱ्यावर एक अवकळा आणलेली असतो तिला मी नाव दिलं  'रंजस'

काय आहे हे रंजस प्रकरण ? एका प्राध्यापिकेने सहज वापरलेला शब्द माझ्या चांगलाच लक्षात राहिला. मी कधीही मराठी शब्दकोषात त्याचा अर्थ किंवा वर्णन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण हा शब्द मला फक्त जून किंवा जुलै महिन्यात आठवतो आणि लगेच विसरूनही जातो. माझा एक मित्र जो स्टुडन्ट अँड टीचर काउन्सेलर आहे, तो आणि मी जेव्हा प्रेमभंग या विषयावर बोललो तेव्हा हा 'रंजस' शब्द अचानक माझ्या तोंडून आला. त्यावर आम्ही वेगवेगळे संदर्भ देऊन चर्चा केली आणि शक्यतो पावसाळ्यात येणाऱ्या एका ठराविक लोकांच्याचेहऱ्यावरच्या भावाला हे नाव दिले.

    'रंजस'  म्हणजे चेहऱ्यावर दिसणारी नाराजी, मग प्रश्न पडतो कि पावसाळ्यातच का पसरते चेहऱ्यावर अशी नाराजी, जून आणि जुलै मध्ये पाऊस खूप पडत असतो त्यावेळी रस्त्यावर आणि घराबाहेर लोक कमी दिसतात, एकतर ते घरी किंवा कामाच्या ठिकाणी असतात अशावेळी एकाकी असणारे लोक अजून एकाकी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तोच 'रंजस' भाव प्रकट होतो. त्याला मुख्य करून प्रिय व्यक्तीचा विरह हे एक कारण असते, मग तो मित्र -मैत्रीण किंवा नातलग  असो, माझा मित्र आणि मी अशा काही लोकांशी बोललो आणि त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप जवळच्या लोकांशी झालेली ताटातूट हेच जास्त प्रमाणात मोठे कारण होते. यामध्ये तरुण वयात अनपेक्षितरित्या झालेला प्रेमभंग जास्त कारणीभूत असावा असं मला वाटतं. पुरुष हे सर्वाधिक 'रंजस' असतात कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हळवे असतात तर स्त्रिया सहनशील

काळीज पिळवटून टाकणाऱ्या आठवणी येणं त्यावेळी जवळ आपलं कोणीही नसणं त्यात पाऊस हा शक्यतो प्रेमाचा साक्षीदार किंवा प्रेमभावना उत्पन्न करणारा असतो अशी कुमारवयांपासूनची शिकवणूक कथा -कवितांमधून झालेली असते त्यामुळे तो एकाकी व्यक्ती मोकळेपणाने बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकला नाही तर अशी भावना चेहऱ्यावर दिसते तेच त्यांच 'रंजसपण'. कोणी म्हणेल कामधंदे नसणारे लोक असा विचार करु शकतात किंवा ते अति हळवे असतील पण खरोखर भावनेवर या जगाचा डोलारा उभा आहे नाहीतर यशस्वी होण्यासाठी सकारात्मक भावना जोपासा असं संदेश जगात का फिरला असता, तशीच ही एक नकारात्मक भावना आहे. मानसशात्रज्ञ यावर मिळून मिसळून राहावे किंवा नवीन मित्र जोडावेत असे उपाय देत असतीलही पण तो एक अतीव दुःखाचा अनुभव आहे जो भविष्यकाळासाठी त्या व्यक्तीला कणखर बनवू शकतो, पण त्या एकाकीपणातून तो तरला पाहिजे.    

Monday, July 25, 2016

महानगरातला महासागर

अंधेरी वेस्ट ला आंबोली नाक्याजवळ एक साधे हॉटेल आहे तिथे एका दुपारी ओळखीच्या दोन लोकांसोबत चहा घेत बसलो होतो. मी दोन्ही पाय हॉटेलमधील टेबलाच्या मधल्या दांडीवर ठेवले होते आणि गप्पा मारत बसलो ते अर्धा - पाऊण तास कधी निघून गेला समजले नाही अचानक टेबलाच्या दांडीवरून खाली पाय घसरला आणि पाहतो तर अर्धा फूट पाण्यात पाय पडला. हॉटेलमधे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता  त्यामुळे तिथून आम्ही जवळच असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो तर रस्ता पाण्याखाली केव्हाच गेला होता. ऑफिसच्या गेटजवळ बरेच जण उभे होते आणि ऑफिसचा सुरक्षा रक्षक आम्हाला वर जाण्यास मनाई करत होता, आता घरी जाण्यासाठी निघायची घाई करायची होती पण पुढच्या काही तासात परिस्थिती भयंकर होणार होती याची काहीच जाणीव नव्हती तर फक्त पाऊस जास्त पडतोय असे वाटत होते तो दिवस होता २६ जुलै २००५.  

 ऑफिसच्या गेटबाहेर अर्ध्या फुटांचं पाणी गुडघ्या पर्यंत आले होते आणि लोक एकामागोमाग अंधेरी स्टेशन च्या दिशेने चालत होते, मी पण त्या गर्दीतून चालत काही अंतर चालत राहिलो वरून पाऊस धो-धो पडत होताच, आंबोली नाक्यावरून स्टेशनकडे जाताना अंधेरी ईस्ट ला जाण्यासाठी एक सब-वे आहे तो काहीसा उताराचा भाग आहे त्यामुळे एस व्ही रोड वरून येणारे सर्व पाणी त्या सब-वे मध्ये खूप वेगाने जात होते मला ते धोक्याचं वाटत होते म्ह्णून काही अंतरावर एका दुकानासमोर काही वेळ उभा राहून अंधेरी ईस्टला कोणत्या दिशेने जावं याचा मी विचार करत होतो इतक्यात एक माणूस त्या सब-वे च्या खाली पाण्याच्या वेगाने ओढला गेला आणि क्षणात नाहीसा झाला आता मात्र काय करावे ते सुचेनासे झाले. अशा परिस्थितीत काही लोक पुढे जाण्याचे धाडस करत होते आणि तिथले स्थानिक लोक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते, पण ऐकतील तर ते लोक कसले, शेवटी स्थानिक लोकांनी काठ्या काढून लोकांच्या पायावर मारायला सुरवात केली तेव्हा कुठे लोक मागे वळले आणि पर्यायी रस्ता म्हणून त्यांच्या मागोमाग मी ही आंबोली रेल्वे फाटकाकडे चालत निघालो पण माझ्या डोळ्यासमोर त्या पाण्यात वाहून गेलेल्या माणसाचा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता, नदी किंवा समुद्रात असे प्रकार सर्रास घडतात पण माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर माणुस वाहून जातो अशी ही भयंकर परिथिती होती पण महानगरात आलेल्या पुराचा खरा सामना अंधेरी ईस्ट मध्ये होणार होता. 

आंबोली फाटका जवळ आलो तेव्हा अचानक खिशातल्या मोबाईल ची आठवण झाली घरी आधीच काळजी करू नका म्हणून फोन केला होता, चार वाजेपर्यंत एमटीएनएल सेवा चालू होती तर मोबाईल सेवेने केव्हाच जीव टाकला होता त्याच्या ही स्क्रीनवर महापूर आला होता, मग खिशात फोन टाकून पुन्हा चालायला लागलो, अंधेरी ईस्ट चा भाग खोलात आहे त्यामुळे पावसाचे सर्व पाणी ईस्ट मध्ये जमा होत होते, डोक्यावर पावसाची रिमझिम चालू होती. कसाबसा चालत दीड तासाने नटराज स्टुडिओ जवळ पोहचलो तिथे छातीएवढे पाणी लागले तरी लोक चालत होते आणि मी ही मागोमाग पंढरीच्या वारीला निघाल्यासारखा चालत होतो फक्त पोहता येत होते याच विश्वासावर. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळ थोडा उंच भाग आहे तिथे पाणी कमी होते मग दहा मिनीटे तिथे थांबून पुन्हा चालायला सुरवात केली पुढे गेल्यावर एक स्कुलबस अर्धी पाण्यात उभी होती आणि पंचवीस तीस लहान मुले केविलवाण्या नजरेने महापूर पहात होती जवळच एक केळीचा गाडा तरंगत होता त्यातील काही केळी बरोबर चालत असणाऱ्या एका व्यक्तीने बसमधील मुलांना दिली. शेवटी पाण्यातून चालण्याचा वैताग आला आणि दुभाजकावर चढून चालू लागलो. चकाला -जेबी नगर  एयरपोर्ट मार्गे कधी पाण्यातुन कधी दुभाजकावरून चालत मरोळ मध्ये पोहचलो. मुंबईची जी अवस्था झाली होती ती सर्वानीच टी व्ही वर पहिली. पण मी चार तास पाण्यातून चालत सुखरूप पोहचलो तेव्हा आयुष्यात पहिला महापुराचा अनुभव घेऊन आलो होतो. आज या घटनेला अकरा वर्ष पूर्ण झाली.      

Thursday, July 14, 2016

उलटा धबधबा - सडावाघापूर

विस्तीर्ण अशा पठारावर प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा आणि समोर कोणत्याही डोंगर-पर्वताचा अडसर नाही त्यामुळे धबधब्यावर पडणारा वाऱ्याचा दाब त्यातून निर्माण झालेला 'रिव्हर्स' - किंवा उलटा धबधबा. पुणे -बेंगलोर हायवेवर साताऱ्यापुढे उंब्रज हे गाव आहे या गावाजवळून २३ किलोमीटर सडावाघापूर हे पठारावर लहानसे गाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर हा पठाराचा भाग 'मिनी महाबळेश्वर' म्ह्णून ओळखला जातो. आजूबाजूला सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा आहेत,पठारावर प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे काही निमुळत्या ठिकाणी हे पाणी एकत्र येऊन उलटे धबधबे तयार झाले आहेत.
                 सडावाघापूर हे सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ठिकाण आहे तिथूनच ४० कि. मी. अंतरावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे 'कोयना' धरण आहे महाराष्ट्राला वरदान ठरलेला जलविद्युत प्रकल्प आहे. कोयनेवरून पुढे चिपळूण -डेरवण तसेच  रत्नागिरीचा कोकण भाग पर्यटनासाठी खुणावतो. सोसाट्याचा वारा आणि पाऊस अनुभवायला सडावाघापूर ला जरूर भेट दया.            


Saturday, July 2, 2016

दर्शन

सव्वापाच च्या सुमारास पाऊस बंद झाला आणि श्रावणात पडतो तसा सूर्यप्रकाश पडला होता, दिवस मावळायला अजून तासभराचा तरी अवकाश होता मग छत्री न घेताच टेकडीवर जाण्यासाठी बाहेर पडलो. ही टेकडी म्हणजे मध्यम उंचीचा डोंगरच, गावापासून साधारण दोन किलोमीटर दूर अशा  या टेकडीवरून आमच्या शहराचा वेध घेण्यासाठी अतिशय सूंदर स्थान आणि आजूबाजूच्या खेड्यांचे नदीचे आणि दूरवर असणाऱ्या उंच किल्ल्याचे दर्शन येथून व्यवस्थित होते.

पायी पायी टेकडीजवळ पोहचलो तेव्हा पठारावरच्या पवनचक्की चे कर्मचारी मोटारसायकल आणि जीपने परतत होते त्यामुळे पंधरा-वीस मिनिटे वाहनांची घरघर चालू होती काही वेळाने वातावरणात शांतता पसरली. टेकडीवरचा सर्व भाग ओलसर, हिरवागार आणि  स्वच्छ दिसत होता, उन्हात सूर्याजींच्या झळांनी पिवळे झालेले गवताचे आच्छादन हिरवे आणि प्रफुल्लीत होऊंन वाऱ्यामुळे डोलत होते. पाऊस नुकताच थांबला होता त्यामुळे टेकडीवर बोटाएवढे पाण्याचे छोटे प्रवाह वाहत होते. एका मध्यम आकाराच्या दगडावर बसून समोर जे जे दिसेल ते पाहण्याच्या प्रयत्न करू लागलो पण नजरेच्या आवाक्या बाहेरचे विहंगम दृश्य पाहता पाहता नजर स्थिर होत नव्हती  पश्चिमेला डोंगर आणि ढगांची युती झाली होती,  ढग आणि डोंगर माथ्यावरून बाहेर पडणारी तिरपी सूर्यकिरणे यामुळे एका बाजूच्या निरभ्र आकाशात लखलखीतपणा आला होता. 

शहरातच्या मध्यभागात कचेरी,महाविद्यालय आणि नदीजवळच्या लक्ष्मीमातेच्या मंदिराचे झाडांमधून दर्शन होत होते. गावाच्या दोन्ही बाजूला दोन नागमोडी नदया आणि एका वळणावरचा झालेला संगम, आणि नदीच्या मार्गावर रांगेत उभी असणारी अशोका आणि निलगिरीची झाडं पाहून असं वाटलं अजून कशाची कमी असावी.  नदीपलीकडे सात-आठ  खेडेगाव आणि छोटया वाड्या वस्त्या आहेत,  मावळत्या सूर्याचा प्रकाश ढगांच्या भगदाडातून एका छोट्या गावावर पडत होता. डोंगराजवळ धुके दाटले होते त्यामध्ये काही गावं हरवली होती. गावातल्या घरांचे पत्रे आणि कौलारू छ्प्पर लक्ख उठून दिसत होते. कौलांच्या मधून बाहेर पडणारा चुलीचा धूर हे दृष्य खूप विलक्षण वाटत होते तिथल्या शांत मानवी अस्तित्वाची जाणीव करून देत होते.       

एव्हाना सूर्य डोंगराआड लपून गेला होता हवेतला गारवा अंगाला चांगलाच जाणवायला लागला होता पण समोरचं निसर्ग रुप पाहून माझी समाधीच लागली होती. इतक्यात एक म्हैस घेऊन चाललेल्या आजोबांचा आवाज कानावर आला 'ओ पाव्हणं, पाऊस ईल आता बघा हिकडं भरून आलंय' आणि मी हसून 'आव मी पाव्हना नाही इथंच गावातला आहे, मुंबईला असतो' असं म्हणालो. आजोबा ही हसले आणि ' तस न्हाय निघा लवकर आता अंधार बी पडल असं म्हणाले. आणि मी ही परतीची वाट धरली आणि मनात विचार आला काही दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखी असतात पण काहीवेळा त्यांना मनातच आणि स्मृतीत बंदिस्त करण्यात काही औरच मजा असते. चालताना नदीजवळच्या मंदिरातून संद्याकाळच्या हरिपाठाचे सूर कानी पडत होते. 
                                                           जय जय राम कृष्ण हरी 
                                                           जय जय राम कृष्ण हरी

Wednesday, June 8, 2016

वरुण मला माफ कर !

मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. मला पूर्वीचे दिवस आठवतात अजून शाळेत जाताना झोडपून काढायचास. खूप गरम होतंय आता सहन नाही होत, दुपारी जमीन तापते अंगाची लाही लाही होते. मला माहित आहे मी कशाच्या आधारावर तुझी विनंती करणार अजून आयुष्यात साधं एक रोपपण नाही लावलं, पण आम्हाला निसर्गाकडून सर्व काही फुकटात घ्यायची सवय आहे. आजूबाजूला उंचच उंच इमारती दिसतात त्याचं कौतुक वाटत पण एखादा डवरलेलं झाड दिसत नाही त्याची खंत वाटत नाही, हे असले आम्ही !
                     विहरी आटल्या, ज्या धरणाची भिंत पाहून पोटात भीतीचा गोळा यायचा तिथला तळ दिसतोय. नदीच्या बाजूची हिरवीगार शेती आता उजाड दिसतेय. वणवण भटकून सुद्धा आता पाणी मिळत नाही शेती तर इतिहासजमा झाली.  कुटुंब च्या कुटुंब गाव सोडून शहरात येताहेत. शहरातल्या स्टेशनवर बस थांब्याजवळ तर कधी रस्त्यात म्हातारे आजी आजोबा भिक मागताना दिसतात. आता तुला वरुण राजा म्हणतो सांग ते भिकारी आहेत का ? पांढरा सदरा  धोतर गळ्यात तुळशीची माळ कपाळावर अष्टगंध, हाथ पसरणारा आपला नवरा पाहून नजर चोरणाऱ्या लुगड नेसलेल्या आणि खांद्याला पिशवी अडकवलेल्या आजी पण आता हाथ पसरू लागल्या आहेत. जगण्याच्या लढाईत तहान - भुकेने शरमेवर मिळवलेला विजय आहे तो !

                       मला बाकीच्या लोकांचे काहीच माहित नाही पण गावच्या शेतात् किमान पंचवीस झाड लावण्याचा माझा विचार आहे आणि त्या झाडांच्या जोपासनेची व्यवस्था  एवढा वेळ नक्की मिळेल. पण त्यासाठी तुला  मुसळधारपणे यावं लागेल म्हणून सांगतो>>>>>> मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. वरुण मला माफ कर !   

(आपण ही पोस्ट वाचताना आजपर्यतच्या आयुष्यात किमान एक वृक्ष लावला असेल तो वाढवला असेल तर किंवा लावणार असाल तर hemant_hemdeep@rediffmail.com वर आपला अनुभव कळवा, किवा अभिप्राय लिहा)

Monday, May 23, 2016

कि -चेन

"ऐ तिथं हाथ लाऊ नको" अशा अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने तीन वर्षाचे मुल दचकले आणि  फोटोसमोरचे उचलेले फळ तिथेच ठेऊन त्याने रडायला सुरुवात केली, मागून त्याची आई आली आणि  मुलावर ओरडणारी वयस्क व्यक्ती काही बोलण्याआधी मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला तिथून घेऊन गेली. मोबाईल आणि वर्तमानपत्रात माना घातलेली सात-आठजण  मात्र एक नजर टाकून पुन्हा काही-बाही वाचण्यात गुंग झाली. त्यांच्या साठी तो एक शोर्ट ब्रेक असावा. घराच्या मोकळ्या आवारात झाडाखाली हार घातलेल्या आणि अगरबत्ती लावलेल्या फोटोच्या डाव्या बाजूला आठ-दहा आणि उजव्या बाजूला तेवढ्याच खुर्च्या मांडल्या होत्या. खाली सतरंजीवर काहीजण बसले होते. मध्यभागी वर्तमानपत्राचे काही अंक ठेवले होते, त्यातले काहीजण पुन्हा -पुन्हा त्याच बातम्या वाचत होते. दोघेजण आपसांत लांबलेल्या पावसाविषयी एकमेकांना एकू येईल अशा आवाजात चर्चा करत होते, तर चारजण कॉलेजला जाणारा मुलगा अपघातात कसा गेला ?,  दोन वर्षांपूर्वीच आजारात आई गेली आणि आता तरुण वयात हा मुलगा गेला म्हणून  हळहळ व्यक्त करत होते.  तिथूनच थोड्या अंतरावर काही बायका जमलेल्या माणसाच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या, त्यामध्ये एक साठी उलटलेले गृहस्थ स्वयंपाक चविष्ट होण्यासाठी आचारयाला सूचना करत होते तेवढ्यात त्या गृहस्थांच्या पत्नीने त्यांच्यावर डोळे मोठे करून पहिले आणि हा स्वयंपाक तेरावीचा आहे आणि तो हौसेने चालला नाही याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या सूचना बंद केल्या.

काहीवेळाने एक मध्यमवयीन स्त्री फोटोजवळ येउन गळा काढून रडू लागली त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईल आणि वर्तमानपत्रातल्या माना वर झाल्या. अपघातात गेलेल्या मुलाचे वडील त्या स्त्रीचं सांत्वन करत तिला घेऊन ते घरात गेले. आता जवळपास सर्व नातेवाईक आणि ओळखीचे आजू बाजूचे लोक जमले होते. एक व्यक्ती चार फुले आणि चंदनाची पाने सर्वांच्या हातात देत होता. सर्वांनी पुढे होऊन ती पाने -फुले फोटोसमोर ठेऊन आपली श्रद्धांजली वाहिली. तिथेच जागा मोकळी करून लोकांना जेवण वाढण्याची व्यवस्था तीन-चार तरुण करत होते, जमलेले नातेवाईक आणि ओळखीचे लोक मान खाली घालून जेवत होते , सर्व लोकांची आणि घरातील बायकांचे जेवण उरकले होते, तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. सर्व जमलेले लोक आपापल्या घरी गेले होते आता घराच्या मागच्या बाजूला घरातील मोजक्या स्त्रिया घरातल्या चर्चा बसल्या होत्या तर पडवीत पुरुष लोक आराम करत होते. घराच्या बाहेरील आवारात जिथे फोटो ठेवला होता तिथे जवळच एक आजोबा झोपले होते. काही वेळाने घरातल्या एका मोठ्या मुलाने तो फोटो उचलून घरात नेउन ठेवला, घराजवळ एक भयान शांतता पसरली त्या शांततेला भेदणारा एक कोकिळेचा आवाज मधून मधून येत होता, पण ते दुसऱ्या कोणाला मंजुळ वाटणारे स्वर कोणा एका व्यक्तीला क्लेशदायक वाटत होते. गेलेल्या व्यक्तीच्या घरापासून चार घर सोडून आपल्या वरच्या मजल्यावरून गेले तेरा दिवस त्या व्यक्तीचे डोळे त्या फोटोचा वेध घेत होते. आता त्या फोटोची जागा रिकामी झाली होती. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आठवणी होत्या, दुख गळ्यापर्यंत दाटून आल होते पण त्या दुखाला मोकळे होण्यासाठी अश्रूंची वाट पुरेशी नव्हती, तिला वाटत होत एकदाच ओरडून रडून घ्यावं पण का ? कधीपासून? असल्या प्रश्नांना द्यायला उत्तरं तिच्याकडे नव्हती. तो या जगात होता तोपर्यंत तिला पहिल्या भेटीच्या आठवणी मोहरून टाकायच्या पण त्याच आठवणी आता जीवघेण्या वाटत होत्या. त्याने  प्रेमाची पहिली भेट म्हणून दिलेले  एक कि-चेन तिच्याकडे होते त्यात रंगीत पाण्यात एक बाहुला आणि बाहुली एकमेकांना मिठी मारून गोल गोल फिरत होते. त्या वस्तूचा स्पर्श आता आयुष्यात जीवघेण्या रिकामेपणाची जाणीव करून देत होता.

Thursday, May 12, 2016

चिखलातला नंदी काढायचा कोणी?

एकदा भगवान शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते.  देवी पार्वतीचे लक्ष एका छोटयाशा गावावर खिळले होते, देवी खूप सूक्ष्म निरीक्षण करत होती. भगवान शंकर स्मित हास्य करीत देवी पार्वतीकडे पहात होते. देवीला त्या गावामध्ये कमालीची विषमता दिसत होती काही लोक खूप श्रीमंत होते, काही उच्च मध्यमवर्गीय तर काही कनिष्ट मध्यमवर्गात मोडणारे लोक होते. कनिष्ट मध्यमवर्गीय लोक आपले जीवन जगताना त्रासिक कसरत करत होते. जीवनावश्यक मुलभूत गरजा पुरवतानाही त्यांच्या नाकी नऊ  येत होते,  या सर्वांच्या हाताखाली राबणारे काही गरीब लोक होते ते मात्र खूप हालअपेष्टा सोसत जीवन कंठत होते. हे सर्व पाहून देवीला ही विषमता नष्ट व्हावी असे वाटू लागले.

देवीने ही  विषमता नष्ट करण्याची आणि सर्व लोकांना सर्वसुखी आणि श्रीमंत करण्याची विनंती महादेवाना केली परंतु हे प्रकृतीच्या विरुद्ध होईल म्हणून महादेवांनी या मागणीस मनाई केली. पण देवीने हट्टाला पेटून ही तिची विनंती मान्य करून घेतली.

महादेवानीही  'तथास्तु' म्हणून त्या गावाचा क्षणार्धात कायापालट केला. आता या गावात काही झोपड्या ऐवजी सर्वठिकाणी टुमदार वाडे दिसत होते. अंगावर भरजरी कपडे आणि दाग - दागिने घातलेले लोक मिरवत होते. प्रत्येकाला खायला पंच-पक्वान होते, बाहेर येण्या-जाण्यासाठी सर्वांच्या दारात टांगे उभे होते. एशोआरामात जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा होत्या तरीही कोणत्यातरी गोष्टीची कमतरता देवी पार्वतीला भासत होती.

देवीने पुन्हा या कमतरतेचा शोध लावण्याची विनंती महादेवाना केली, ही विनंती महादेवांनी लगेच मान्य केली आणि त्या कमतरतेचा शोध लावण्यासाठी स्वत: या गावाला भेट देण्याचे ठरवले. म्हणून महादेवानी त्यांचा अतिप्रिय भक्त नंदीला सोबत घेतले आणि  एका शेतकऱ्याच्या रुपामध्ये या गावात दाखल झाले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक पणे एका चिखल असलेल्या खड्ड्यात नंदी अडकला. नंदीला बाहेर काढणे आवश्यक होते म्हणून त्या शेतकऱ्याने जवळच एका टुमदार वाडयाचा दरवाजा ठोठावला, आतून एका श्रीमंत व्यक्तीने  दरवाजा उघडला आणि काय पाहिजे? अस त्रासिक मुद्रेने विचारले. शेतकऱ्याने गावच्या हद्दीजवळ आपला बैल चिखलात अडकला असून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली, पण त्या शेतकऱ्याचे बोलणे पूर्ण होण्याआधी त्या श्रीमंत व्यक्तीने सोन्याच्या मोहरांची एक थैली त्याच्या हातात दिली आणि  काही लोकांना या मोहरा देऊन त्या मोबदल्यात आपला बैल बाहेर काढ असा सल्ला दिला आणि त्याने आपला दरवाजा बंद केला.  

शेतकरी आता पुढच्या घरात मदत मिळेल या आशेने पूर्ण गाव फिरून आला मात्र कोणीही श्रमदान केले नाही. प्रत्येकाने आर्थिक मदत देऊ केली, पण बैल बाहेर काढण्यासाठी त्या शेतकऱ्याला दोन-तीन लोकांची गरज होती, या गावाच्या जवळपास दुसरे कोणतेही गाव नव्हते त्यामुळे वेळेत मदत मिळणे गरजेचे होते. त्यामुळे महादेवानी आपला नंदी स्वतःच  चिखलातून बाहेर काढला, आणि कैलास पर्वतावर परतले. महादेवानी कायापालट केलेल्या या गावात सर्वच लोक श्रीमंत झाले होते त्यामुळे त्यांना कोणी नोकर मिळत नसे अशाने लोक आपली काम फक्त आपणच करत होते दुसऱ्याच्या कामाला कोणी हात लावत नव्हते. आपोआपच सर्वांमध्ये स्वार्थीपणा निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या स्वभावात राग, द्वेष  आणि मत्सर वाढला होता. या गावच्या लोकांमधून माणुसकी हरवली होती.  हे सर्व देवी पार्वतीला जाणवले होते म्हणून या गावाला जसे होते तसे करण्याची विनंती केली. आणि महादेवानी 'तथास्तु' म्हणून ती मान्य केली.

महादेवानी देवी पार्वतीला सांगितले ' जेव्हा निसर्गनियम मोडून एखाद्या गोष्टीची खूप मोठी प्रगती होते ती तकलादू असते, मानवी स्वभाव तर खूप लवचिक आहे त्यामुळे त्यांनी आपला उद्धार आपल्या प्रयत्नाच्या जोरावर  करावा आणि माणुसकी हे मानवी स्वभावाचे मुलभूत अंग आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नये. अन्यथा 'चिखलातला नंदी काढायचा कोणी? अशी अवस्था होते

Thursday, April 28, 2016

सैराट झाल जी !

मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला एक वास्तववादी दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याचा नवा चित्रपट घेऊन येतोय 'सैराट'. त्याच्या  'पिस्तुल्या'  आणि 'फ्यांड्री' या दोन्ही फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते आणि आता सैराट सुद्धा त्याच मार्गावर आहे या चित्रपटाचा पिमियर बर्लिनमध्ये होतोय. 'फ्यांड्री'  मध्ये समाजातील जातीय व्यवस्थेवरचे भयाण वास्तव एवढे कलात्मक पद्धतीने मांडले होते  कि हा चित्रपट कधीही पहिला कि अंगावर काटा उभा राहतो. मी नेहमी मराठी चित्रपट पहात असतो पण काही मोजक्या कलाकृती सोडल्या तर बऱ्याच चित्रपटांकडून माझा अपेक्षा भंग झाला होता, सतत काहीतरी कमी आहे अस वाटायचं  २०१३ मध्ये 'दुनियादारी आणि टाइमपास'  या दोन्ही व्यावसायिक चित्रपटांना एकामागोमाग घवघवीत यश मिळाले. अशातच 'फ्यांड्री' च्या पुरस्काराची बातमी मिडीयामध्ये झळकत होती. सुरवातीला मला वाटलं कि काहीतरी वेगळ नाव द्यायचं म्हणून  'फ्यांड्री' हे नाव चित्रपटाला दिल असाव आणि पुरस्कार खिशात घातले असावेत पण जेव्हा मी चित्रपट पहिला तेव्हा या चित्रपटाचा आणि नागराज या नावाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला कि  'फ्यांड्री चित्रपटाशी संबधित जितकी जास्त माहिती गोळा करता येईल तितकी केली. नागराज मंजुळे हे काय रसायन आहे आणि त्याचं दिग्दर्शन कोणत्या उंचीवरच आहे याचा  प्रत्यय आला.

ज्या सामाजिक परीस्थित हा माणूस वाढला आहे त्याचे अचूक आणि प्रभावी दर्शन  'सैराट' च्या  ट्रेलर मधून दिसतच आहे. मिडीयावर या चित्रपटाची  चर्चा जोरात सुरु आहे. नागराज चे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे, चित्रपटाची अजिबात पार्श्वभूमी नसलेले  कलाकार  सोमनाथ अवघडे राजेश्वरी खरात आणि सुरज पवार यांच्या कडून जेवढे अप्रतिम काम झाले होते तेवढाच सहज अभिनय आकाश तोमर आणि रिंकू राजगुरू यांनी केला आहे हे ट्रेलर पाहूनच समजते. अजय-अतुल च संगीत म्हणजे मेजवानीच आणि कान मंत्रमुग्ध होणारच. २९ एप्रिल ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी नागराजला मन:पूर्वक शुभेच्छा …

Thursday, March 31, 2016

कल्पनाच पण अशी हवी !



एक ग्रुप एड्मीन काही दिवसांपासून सतत च्या चेटिंग मेसेजस मुळे  हैराण झाला होता, दर दोन मिनिटात मोबाईल वर  मेसेजचा  'टुंग ' असा आवाज येत होता. भरीस भर म्हणून मधूनच 'आ s s s s s शांताब्बाई' अस कोणीतरी बोम्बलेले  वोईस मेसेजेस, व्हिडीओ  आणि ग्रुप चेटिंगमध्ये एकमेकांना दिलेल्या भयंकर शिव्या, हे असला धिंगाणा सुरु झाला कि एक दोन तास गप्प बसण्याच कोणी नाव घेत नसे. ही रोजची कटकट झाली होती म्हणून अखेर त्या एड्मीनने ग्रुप डिलीट करायचा निर्णय घेतला, पण यावर काही उपाय सुचतोय का हे पाहण्यासाठी थोडा वेळ घ्यावा अस ठरवलं, फक्त उपाय असा पाहिजे होता कि हे चेटिंग मेसेजस बंद न होता यामधून काहीतरी चांगली गोष्ट घडावी. नक्की काय करायचं हेच एड्मीनला सुचत नव्हते आणि दोन दिवसानंतर तो ही  हे सर्व विसरला आणि आपला कामात व्यस्त झाला तोपर्यंत अधूनमधून शांताबाई, गण्या, बंड्या, बाई  आणि मास्तर यांचा ग्रुपवर धिंगाणा चालूच होता.

एका संध्याकाळी एड्मीनने त्याच्या सोसायटी बाहेर 'दोन दिवस पाणी येणार नाही' असा फलक वाचला, महानगरपालिकेने पाणी कपात केली आहे हे समजले त्यामुळे सोसायटी अध्यक्षाला बोलून काही उपयोग नव्हता, पाणी कपातीचा पहिला दिवस संपला आणि एडमीनच्या घरातील पाण्याचा साठासुद्धा पहिल्याच दिवशी संपला आणि त्याच दिवशी संध्याकाळी एडमीन पाण्यासाठी सोसायटीच्या आवारात पाण्याच्या टेंकर मागे रांगेत उभा होता. 'दोन्ही हातात दोन बादल्या घेतलेला एडमीन'  अशा अवतारात त्याचा ग्रुपवर आणि फेसबुकवर फोटो प्रसिद्ध झाला. दुसऱ्या दिवशी तर पिण्याच्या पाण्यासाठी एडमीन मिनरल वॉटरच्या बाटल्या शोधत फिरत होता. महानगरपालिकेच्या कृपेने दोन दिवसानंतर पाणी पुरवठा नियमित झाला होता पण पुन्हा पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही याची काहीच शाश्वती नव्हती.
    
या दोन दिवसात पाण्यासाठी झालेल्या त्रासातून ग्रुपवर येणाऱ्या फालतू मेसेजस काय करायचं यावर एडमीनला उपाय सुचला होता आणि त्याप्रमाणे तो कामाला लागला. प्रथम एडमीनने  जो जास्त फालतू मेसेज पाठवण्यात वेळ घालवतो अशा एका ग्रुप सदस्याला ग्रुपमधून काढून टाकले आणि त्याला फोन कॉल केला आणि तो सदस्य जिथे राहतो तिथल्या पाणी पुरवठा स्थिती विषयी माहिती घेतली असे करून एक एक करत जवळपास ४२ जणांना ग्रुप मधून काढून त्याने फोन कॉल केले आणि माहिती घेतली तर जवळपास सर्वजण पाणी प्रश्नामुळे वैतागले होते  सर्व उपनगरात हीच स्थिती होती आणि मे  महिन्यापर्यंत ही परिस्थिती अजून भयानक होणार होती याची जाणीव सर्वांना एडमीनने करून दिली आणि त्यासाठी कमी वेळखाऊ पण परिणामकारक काम करण्याची विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे सर्वजण तयार झाले.

आता एक नवीन नावाचा ग्रुप तयार झाला होता. ग्रुपचे नाव होते 'एक बादली पाणी' एडमीन तोच होता ग्रुप सदस्य तेच होते फक्त ग्रुपचे नाव आणि मेसेज पूर्ण बदललेले होते. ग्रुप मध्ये ४२ सदस्यापैकी ३६ सदस्य अतिशय उत्साही होते. प्रत्येकाला रोज आपल्या रोजच्या वापरातील कमीतकमी १ बादली पाणी वाचवायचे होते आणि त्यासाठी काही उपाय प्रत्येकाने शोधून ग्रुपवर पोस्ट करायचे होते. सुरवातीला काही उपाय एडमीनने सुचवले.

१) घरात पाण्याची टाकी सोडून इतर भांड्यात असणारे पाणी ओतून न देता एका बादलीत साठवायचे आणि ते कपडे, भांडी धुण्यासाठी वापरायचे. 

२) बाथरूमच्या वर बसवतात त्या टाकीतील पाण्याचा उपयोग इतर भांड्यातील पाणी संपल्याशिवाय करायचा नाही. 

३) पाण्याचा नळ सोडून ब्रश करणे, दाढी करणे असली कामे करायची नाहीत.

४)  शॉवर चा वापर टाळून आणि आपली गरज ओळखून पाणी टाकीतून घ्यायचे.

पाणी वाचविण्यासाठीचे असे अनेक उपाय एकमेकांना सुचवून या ग्रुपने गेल्या ४० दिवसात प्रती माणसी कमीतकमी १ बादली खाली दिल्याप्रमाणे पाणी वाचवले. प्रत्येक दिवशी आपापले पाणी वाचविण्याचे  मेसेजेस, व्हिडीओ शेअर केले.         

 ३६ सदस्य X  १ बादली (१८ लिटर) = ६३८ लिटर प्रत्येक दिवसाला पाणी वाचविले
६३८ लिटर X ४० दिवसात =  सुमारे २५५२० (पंचवीस हजार पाचशे वीस लिटर पाणी वाचविले. -अजून पाणी वाचवा मोहीम चालूच आहे)  

आपल्या सर्वांकडून नकळत दिवसभरात कितीतरी पाणी वाया जात असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यावर थोडे लक्ष देऊन आपण ही 'पाणी वाचवा' ही मोहीम राबवू शकतो. पण गरजे पेक्षा जास्त मिळणाऱ्या वस्तूला मोल नसते. तुम्ही कोणाला काही सांगायला गेलात तर अशी उत्तरं येतील की " पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आणि आणि २९ टक्के जमीन आहे'  त्यावेळेस अस उत्तर दया कि ७१ टक्के पाणी आहे मग १ लिटर पाण्यासाठी लाज नसल्यासारखे २० रुपये का मोजता ?       

Tuesday, March 1, 2016

माझी गोवा 'वारी'

'मी गोव्याचा brand ambassador झालो तर?' या विषयावर मी खूप छान निबंध लिहू शकतो. गेल्या १५ वर्षात मी  ४ वेळा गोव्याला जाउन आलो. थोडक्यात गोवा हे माझं आवडत ठिकाण आहे!  दरवेळी गोवा भेटीत माझ्याबरोबर वेगवेगळे मित्र होते. यावेळी वास्को वास्तव्यास होतो त्यामुळे पणजी आणि गोव्याचे प्रसिद्ध समुद्रकिनारे यापासून बराच लांब प्रवास करून जावं लागत असे. दुचाकीचा पर्याय होता पण पहिला दिवस प्रवासाने थकलो होतो आणि तो दिवस वाया जाऊ नये म्हणून दुचाकीवरून वास्को जवळ एक 'बोगमालो' नावाचा समुद्रकिनारा आहे तिथे गेलो . इतर ठिकाणापेक्षा या समुद्रकिनाऱ्यावर कमी गर्दी असते. पहिला दिवसभर याच समुद्र किनाऱ्यावर आम्ही फिरत होतो.  संध्याकाळी वाळूत मित्रां बरोबर गप्पा मारत बसलो होतो अंधार पडू लागला तेव्हा मित्रांपासून हळूच थोडा दूर येऊन समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ गेलो आणि दूरवर एक जहाज होत त्याकडे पाहत बसलो. त्या दिवशी भरती असल्यामुळे मोठा आवाज करत फेसाळणारया लाटा किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच वेगाने परत समुद्रात मिसळत होत्या. हे किती तरी वेळ स्वतःला विसरून पाहत होतो. जगात कितीतरी गोष्टी विशाल आहेत पण मला समुद्राच विशालपण खूप अवर्णनीय वाटत. काही वेळाने मित्रांची बोंब ऐकायला मिळाली आणि मुकामाच्या ठिकाणी निघालो.


वास्को हवाई अड्डा ज्याला 'गोय' किवा 'देबोलियम' ऐअर पोर्ट म्हणतात तिथुन एक किलोमीटर जवळ आम्ही तळ ठोकून होतो. पहिल्या दिवशी दुपारी आम्ही मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो साधं पण बऱ्यापैकी हॉटेल होत ते , जवळच काही मंडळी 'शांभवी' घेत बसले होते. दारू …! त्यांच्याकडे पाहून आणि त्याचं बोलण ऐकून अस वाटत होत कि रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडीतरी घेतली पाहिजे असा गोवा वासीयांचा नियम असला पाहिजे. तस गोवा आणि दारू हे नात खूप सहज जोडलं जात कारण एकतर तिथं एकामागोमाग दारूची दुकान असतात, आणि तीथे ती स्वस्तही मिळते आणि पिवुन तुम्ही गाडीही चालवू शकता.  ड्रंक अंड ड्राऐव्ह हा नियम नाही (कृपया मी दारूचा उदोउदो करत नाही) कारण आताच नटसम्राट चित्रपटाची समीक्षा वाचली होती. त्यात दारूपुराण बरच सांगितलं होत अस समीक्षकाच म्हणण होत पण शांभवी हा नवीन शब्द मला याच चित्रपटातून ऐकायला मिळाला, असो पण गोव्यातला  बिनधास्तपणा तिथल्या वातावरणाला शोभून दिसतो हे वास्तव आहे.

गोव्यात मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशी हॉटेल सहज मिळत नाहीत. आणि भुकेच्या तडाख्यात आपण एखाद्या हॉटेलात गेलो तर चांगलं जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. आणि इथे भरपूर समूद्र किनारे आहेत म्हणजे प्रत्येक हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळत असावेत हा फक्त एक समज आहे. त्यामुळे चांगला दर्जा ठेवला तर गोवा हे हॉटेलिंगच्या व्यवसायात पडू पाहणाऱ्या एखाद्या मराठी माणसाला उद्योगाच प्रवेशद्वार होऊ शकत. बाकी समुद्राजवळ आणि  पणजी, वास्को, तसेच मडगाव या शहरात स्वच्छता चांगली ठेवली आहे . रस्ते रुंद आहेत, ठिकठिकाणी पोलिस दिसत नाहीत पण अपघात सुद्धा जास्त पाहायला मिळाले नाहीत.

गोवा उशिरा स्वतंत्र झाला येथे पोर्तुगीजाचं राज्य होत, देशात सर्वाधिक परदेशी पर्यटक गोव्यात येतात त्यामुळे इथल्या लोकांच्या किंवा मुळातच गोव्याच्या संस्कृतीला वेगळा मुलामा आहे, म्हणून इथे आलेले देशी पर्यटक यात काही दिवस हरवून जातात. दरवेळी प्रमाणे माझी ही गोवा 'वारी' संपली होती पण परतीच्या प्रवासासाठी माझा पाय निघतच नव्हता.  
                 

Thursday, February 18, 2016

बातमी २५१ रुपयांच्या स्मार्ट फोनची !

खरी कि खोटी माहित नाही पण २५१ रुपयांच्या मोबाईलची बातमी सकाळपासून ऐकायला, वाचायला मिळत होती, म्हणून मी freedom कंपनीच्या वेबसाईट ला भेट दिली. गुगल वर सर्वात वर या कंपनीच्या बातमीची लिंक मिळाली. मी तो मोबाईल book  करणार नव्हतो हे आधीच ठरवलं होत. फक्त मला नेमका काय प्रकार आहे ते पाहायचं होते. इतर कंपन्या जो मोबाईल ८ ते ९ हजार रूपयात देतात त्याच दर्जाचा मोबाईल  ही  कंपनी रुपये २५१ मध्ये म्हणजे १ किलो  तुरडाळी च्या दरात देत आहे तर बघूया.  आता हा फसवणुकीचा प्रकार असेल तर ?  या कंपनीला कोणतीही इलेक्ट्रोनिक उत्पादनाची पार्श्वभूमी नाही, कंपनी २०१५ मागील वर्षी स्थापन झाली आहे. कंपनी अस काय करते ज्यामुळे त्याना एवढा स्वस्त मोबाईल ग्राहकांना देण परवडेल अगदी ना नफा ना तोटा तत्वावर दिला तरी,  चार पानांच्या बेवसाईट वर book  करण्यासाठी पहिला पर्याय लगेच दिसतो. दुपार पर्यंत ६ लाखांवर हिट्स येऊन कंपनीचा सर्वर बंद झाला आणि तो २४ तासांत व्यवस्थित होईल अशी एक विनंती वेबसाईट वर दिसत होती. तितक्यात अजून एक बातमी सोशल मिडीयावर झळकायला लागली ती म्हणजे (कंपनी फसवणूक करणार आहे )  या कंपनीची अजून एक वेबसाईट आहे riningigbell.co.in त्यावर हाच मोबिल रु. २९९९ ला विक्रीला आहे.

आता प्रश्न आहे २५१ रुपयांचा, आता जो नेटबँकिंग करतो तो नक्कीच सुशिक्षित असणार आणि त्याला ही  रक्कम फार मोठी नाही आणि फसवणूक झाली तर एवड्या रकमेसाठी ग्राहक कोर्टात कशाला जाईल. समजा  जर १ लाख लोकानी जरी हा मोबाईल  book  केला तरी  कमीतकमी रुपये २५१००००० (अडीच कोटी) इतकी मोठी रक्कम कंपनीच्या घशात जाईल. विश्वास बसावा म्हणून की काय वेबसाईटवर  'मेक इन इंडिया'  चा संदर्भ दिसतो. Contact Us  वर क्लिक केली कि आपलीच माहिती भरावी लागते,  पण book  करणाऱ्यांना ४  महिन्यानंतर  यावर्षी जून मध्ये खर -खोट कळेल कारण कंपनी जूनमध्येच मोबाईल घरपोच देण्याचं आश्वासन देत आहे पण सध्या तरी  खर काय आहे ते आश्वासन देणाऱ्या कंपनीलाच माहीत. 

Monday, August 24, 2015

दोन पहाड

बिहार मध्ये गया जिल्हयात गेहलोर या मागासलेल्या एका छोट्या गावात एक सामान्य माणूस एकटा डोंगर पोखरुन आपल्या गावासाठी रस्ता तयार करायच ठरवतो आणि एक मोठी संघर्षयात्रा सुरु होते . आपल्या पत्नीचा जीव ज्या पर्वतावर पाय घसरुन गेला त्या पर्वताचा भेद करुन एक रस्ता तयार करण्याचा निश्चय करतो ज्यामुळे हजारो लोकांना पर्वताला परिक्रमा घालताना होणारा त्रास कमी होईल ही जनोपयोगी भावना.

नाव दशरथ मांझी ३६८ फुट लांब आणि २५ फुट रुंद रस्ता बनविन्याचा विडा उचलल्या सारखा दोन हाथ करायला सुरुवात करतो आणि २२ वर्ष हा व्यक्ति आपल्या श्रमाने आणि क्लूप्तिने या पर्वताचा भेद करतो. पण इतकी साधी आणि सोपी गोष्ट असेल का हो ही! दुष्काळ आणि सतराशे साठ विघ्न याना तोंड देत हा तपस्वी पर्वताला स्वतच दिलेले आव्हान पूर्ण करतो. हा संघर्ष उत्तमरीत्या मांझी या चित्रपटात दाखवला आहे.
दशरथ मांझीने हातात घेतलेले काम आणि २२ वर्षे शारीरिक कष्ट आणि येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडु शकले असते आणि पर्वत फोडून रस्ता तयार करण्याचे आव्हान कधीच संपुष्टात आले असते, पण स्वतःच्या २५ पट जास्त वजन उचलु पाहणाऱ्या प्रयत्नवादी मुंगी कडून प्रेरणा घेतल्यासारखी पराकष्टा करुन रस्ता तयार केला.

२००७ मध्ये दिल्ली येथे एका रुग्णालयात कैंसरशी झुंज देत शेवटचा श्वास घेतला. राजकिय उदसिनतेमुळे गेहलोर गावासाठी पक्का रस्ता त्यांच्या मृत्युनंतर ४ वर्षानी तयार झाला.दशरथ मांझीच्या मिडिया वरील एका मुलाखती मध्ये ते म्हणतात जोपर्यंत ही पृथ्वी आहे तो पर्यन्त हा रस्ता राहील. एका पहाडाशी दुसऱ्या पहाडा एवडया व्यक्तिमत्वाने घेतलेली मैत्रीपूर्ण झुंज म्हणजे सकारात्मकतेची गाथा झाली.

Saturday, April 25, 2015

आपली शाळा


आमची चौथी' पर्यंतची प्राथमिक शाळा म्हणजे 'जीवन शिक्षविद्या मंदिरहे शाळेचे नाव मला आजही सुंदर वाटते, मारुतीच्या मंदिरात भरणाऱ्या बालवाडीतून आमची रवानगी प्राथमिक शाळेत झाली. मोजके शिक्षक आणि शिक्षिका असणाऱ्या या शाळेत आम्ही काय शिकलो हे पूसटसं आठवते पण त्या शाळेतल्या शिक्षणाच्या दर्जाची मी कधीच खंत ठेवली नाही, त्यावेळी आमच्या गावात इंग्रजी शाळा यायला अजून दशकभराचा अवकाश होता. त्यामुळे प्राथमिक आणि पुढे माध्यमिक शिक्षण मराठीतून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

एक छोटे प्रवेशद्वार त्यावर शाळेचे नाव आणि कुंपणाच्या आतमध्ये अेल्युमिनिअमचे पत्रे असणाऱ्या भिंतीचे पाच वर्ग होते. सर्व शिक्षक आठवत नाहीत पण एक 'खान गुरुजी' म्हणून मुख्याध्यापक होते ते मात्र आजही आठवतात त्याला कारणही तसेच आहे, हे खान गुरुजी आमच्यादृष्टीने जगातला सर्वात मोठा माणूस होता कारण तोपर्यंत शाळा आणि घर हेच आमचं जग होत. नक्की आठवत नाही पण तिसरी किवा चौथीच्या एका चाचणी परीक्षेत ' भारताचे पंतप्रधान कोण ? असा प्रश्न होता त्यावर उत्तर म्हणून 'खान गुरुजी' हे नाव बहुमताने मंजूर झाल्यासारखे सर्व विध्यार्थ्यानी लिहिले आणि आमच्या वर्गशिक्षिकेने त्याचा राग आमच्यावर असा काढला होता कि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांचे नाव द्यायला हवे होते कि काय असे वाटले.      

चौथी पर्यंतच्या शाळेत दुध पिणे हे सर्व विध्यार्थ्यांसाठी बंधनकारक होते त्यामुळे आम्ही नाक बंद करून घटाघट ते  पिउन टाकत असू, त्यावेळी शाळेतले दुध पिणे हा आम्हाला सार्वजनिक अत्याचार वाटत असे त्यामुळे त्या बालवयात आमच्या मनात असंतोष मूळ धरू लागला होता, अशातच एकदा शाळेने 'गांधी टोपी' सर्वांसाठी अनिवार्य केली. आणि जवळ पास पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देत शाळेला सलग दोन दिवस दांडी मारली. शेवटी शाळेने नमते घेत गांधी टोपीचा निर्णय रद्द केला. आमच्या विरोधाला कारण होत कि मुली गांधी टोपी घातल्यावर आम्हाला हसतात.            

शाळेच्या कुंपणाबाहेर मीठ टाकलेल्या बोरांची आणि चिंचाची चव जिभेवरून मनावर उतरल्यासारखी अजूनही तशीच आहे. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत चौथीतल्या पुस्तकातले बाल शिवाजी आमच्याबरोबर मोठे झाले होते, त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. पण शाळा अजूनही तिथेच उभी होती, आजही आहे. तिथे कित्येक विद्यार्थी, शिक्षक येउन गेले असतील पण शाळेचे नाते कितीजणांनी जपले असेल माहित नाही.प्रत्येकाची शाळा थोडया फार फरकाने अशीच असू शकते. शिक्षणाचा श्रीगणेशा जिथून सुरु केला ती आपल्या प्रत्येकाची प्राथमिक शाळा असाधारण महत्वाची असते असे वाटते. कोणाला सुखवस्तूंच्या गर्दीतून कधी शाळेला भेट देता आली तर जरूर द्यावी कारण इथे येउन आपली सुरुवात आपण पुन्हा पाहू शकतो.