Monday, March 30, 2015

सहज आठवलं !

 खूप वर्षांपूर्वी पुण्याला कर्वेनगर येथे हिंगणे होम कॉलनीमध्ये रहात होतो. दुपारच्या जेवणासाठी पाच मिनिट अंतरावर एक हॉटेल होते तेथे  चालत जावं लागत असे, अशाच एका दुपारी मी हॉटेलकडे निघालो होतो. कॉलनीमध्ये मुख्य रस्त्यापासून आत येणारा रस्ता  थोडासा जास्तच वळणाचा होता. दुपारची वेळ होती त्यामुळे रस्ता मोकळाच होता इतक्यात एक भरधाव वेगाने रिक्षा आली रिक्षामध्ये मोठ्या आवाजात गाणं वाजत होत आणि कदाचित गाण्याच्या तालावर रिक्षा ड्रायव्हर अगदी आनंदात रिक्षा चालवत येत होता. रिक्षा मी जात असलेल्या विरुद्ध दिशेला जात होती.  मी रस्त्याच्या डाव्याबाजुने चालत होतो तरीही  रिक्शा मला जवळपास घासून गेली. मला राग आला होता पण रोजची सवय असल्यासारखा  मी मागे वळून न पाहता पुढे चालत राहिलो आणि अचानक तीन सेकंदात  रस्त्यावर कोणीतरी मोकळा पिंप टाकावा असा आवाज झाला  म्हणून मी मागे वळून पहिले तर तीच  रिक्षा रस्त्यावर  आडवी झाली होती, ते पाहून आजूबाजूचे सातआठ लोक जमा झाले. मी ही धावत रिक्षाजवळ गेलो, सर्व लोक जरा अंतर ठेउनच रिक्षाची पाहणी करत होते इतक्यात आत कोलमडलेला रिक्षा ड्रायव्हर उडी मारून रिक्षाच्या बाहेर आला आणि उभा राहिला मी रिक्षाच्या आतमध्ये वाकून पहिले तर आत अजून एक माणूस आपल्या दोन्ही पायावर बसून आपल्या तोंडातून आवाज काढण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित त्याच्या पोटावर मार लागला असावा अशामध्ये त्या रिक्षामध्ये टेपवर गाणं अजूनही वाजतच होत. हे पाहून मला खूप जोराने हसायला आलं आणि मी तिथून काढता पाय घेतला.  हा लेख लिहताना ते दृश्य आठवून पुन्हा पुन्हा हसायला येत होते.

पुण्यातच एका सकाळी  बेकरीमधून काही सामान आणण्यासाठी मित्राच्या बाईकला किक मारली, बाईकच्या आवाजात ' ब्रेक खराब झालेत' हे मित्राचं वाक्य मला ऐकुच आलं  नाही. माझी गाडी सुसाट धावत होती. बेकरीच्या  समोर गाडी लावू म्हणून मी बेकरी जवळ आल्यावर ब्रेक लावायचा प्रयत्न केला पण कसल काय गाडी थांबली ते ही सरळ दुकानाच्या आत काउंटरला धडक मारूनच सुदैवाने काही तोडफोड आणि इजा झाली नाही बेकरीमध्ये पण कोणी नव्हते त्यामुळे पटकन गाडी बेकरीच्या बाहेर काढली आणि कमी वेगात घराजवळ आणून लावली. म्हणून बाईकवर मागे बसायला मी नेहमी प्राधान्य देतो.

नवीन बाईक शिकलेला माझा मित्र शरद आणि मी पुण्याला असताना एकदा 'पुणे केम्प' येथे बाईकवरून फिरत होतो. संध्याकाळचे सात वाजले होते आणि रस्त्यावर रहदारी वाढली होती आणि त्यातच डेक्कन कडे येणारा रस्ता आम्हाला सापडत नव्हता. आणि रस्ता शोधत चुकीच्या मार्गाने जात होतो अशावेळी एक हेल्मेट घातलेला बाईकवाला आमच्या जवळून जात होता. त्याला रस्ता विचारावा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत होतो इतर वाहनांचा आवाज जास्त होता त्यामुळे आमचे बोलणे त्याला ऐकू जावे म्हणून शरदने गाडी शक्य तेवढी त्याच्या गाडीजवळ नेण्याचा प्रयत्न केला आणि या गडबडीत तो बाईकवाला काय? काय? अस म्हणत असताना आम्ही दोघे आमच्या बाईकसह त्याच्या बाईकवर कोसळलो त्याने आम्हाला आणि आम्ही त्याला कसेबसे उभे राहण्यास मदत केली आणि डेक्कनकडे जाणारा मार्ग सांगितला. हे सर्व सहज आठवल कि आजही हसायला येते.

Sunday, March 15, 2015

'अति' कॉमन Man



                            हा तुमच्या आमच्या सारखा  'अति' कॉमन Man आपला 'प्रतिनिधी'

डू समथिंग



मार्च महिना होळीचा दिवस आणि दुपारची वेळ आणि सर्वत्र सुट्टी असल्याने सेन्ट्रल रेल्वेच्या एका डब्यामध्ये मोजकेच लोक वेगवेगळ्या बाकांवर बसलेले तसाच एक तरुण एकटाच एका बाजूला बसून आपल्या मोबाईलवर गाणी ऐकण्यात मग्न होता अजून एक तरुण रेल्वेच्या दारावर उभा होता तो कधी बसलेल्या तरुणाजवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जोराचा ठोसा लावला या अचानक झालेल्या हल्ल्याने तो तरुण गडबडून गेला आणि काही कळायच्या आत त्याचा मोबाईल चोराने हीसकावून घेतला आणि 'मुंब्रा' स्टेशन वर रेल्वे थोडा वेग घेत असताना उडी घेतली आणि क्षणार्धात गायब झाला. ज्याचा मोबाईल चोरीला गेला तो पळून जाणाऱ्या चोराकडे पाहत राहिला गाडीने वेग घेतलेला आणि त्याची पिशवी गाडीतल्या शेल्फवर होती त्यामुळे तो  उडी मारून  चोराचा पाठलाग करू शकत नव्हता. काही सेकंदात त्याच्या लक्षात आले कि आपल्या तोंडातून रक्ताचा स्त्राव होतोय. काही वेळाने मनातल्या मनात काही पुटपुटत वीस- पंचवीस शिव्या देत तो तरुण पुढच्या स्टेशनवर रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी उतरला, पण त्याचा किती उपयोग झाला असेल हे आपल्यातल्या कित्येक जणांना माहिती असेलच फक्त त्याच नशीब चांगलं कि तो दरवाजावर उभा नव्हता नाहीतर 'ठोसा'  लागून जीवावर यायला किती वेळ लागला असता.   

सकाळी जॉगिंग साठी गेलेल्या महिलांना एकटी पाहून गाडी चा हॉर्न वाजवणे, जवळ गाडी नेउन उभी करणे हे आजकालचे सर्रास प्रकार झाले आहेत,  या  घटना मी प्रत्यक्ष पहिल्या आहेत मग विचार येतो कि हे गुन्हे करणारांना पोलिस,  कायदा, शिक्षा या गोष्टीचं भय राहिल नसाव म्हणून त्यांची मजल वाढत जाते. आणि लोकं सुद्धा सरावून जातात पण ज्याच्यावर वेळ येते त्यालाच या गोष्टीचं गांभीर्य कळत. मग यावर काय उपाय? आणि हा कोणी शोधायचा? जनतेला सरंक्षण देण्याची जबाबदारी कोणाची ? का जनतेनेच त्यावर पर्याय शोधायचा मग व्यवस्था कायदा या शब्दांना काय अर्थ उरतो. 
 
गुन्हे होण्यापासून १०० टक्के यश मिळणे अशक्य आहे पण त्याचं प्रमाण कमी करण निश्चितच यंत्रणेच्या हातात आहे. यंत्रणेवर दबाव आणू शकतात ते सत्ताधारी, ते काम त्यांनी करायला हवे. गुन्हेगाराला गुन्हा करताना दहा वेळा विचार करावा लागेल अशी कायद्याची अमलबजावणी झाली पाहिजे. एकाच विभागात गुन्ह्याचं वाढणारे प्रमाण हे तिथल्या कायदेरक्षकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या गुन्हेगारांना कोणत्याही राजकीय पक्षाचं किवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच अभय मिळत असाव अस वाटण्याची शक्यता पण कमीच, मग हे सराईत का होतात? कायद्यामध्ये एखाद्या गुन्हेगाराला चार-सहा महिने डांबून ठेवण्याची व्यवस्था असूनही हे मोकाट का फिरतात ? हे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत. माणूस एकच पण त्याच्या विरोधात  वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो तक्रारी अशा माणसाला समाजापासून दूर ठेवण्याचा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी होणे खरच खूप गरजेच आहे. व्यवस्थेला गृहीत धरून ही जमात नवा गुन्हा करण्यासाठी सज्ज  होते.


तुम्हाला मतदान केलं तुम्ही सत्तेवर विराजमान झालात. मेट्रोचे प्रकल्प येताहेत, बुलेट ट्रेन आणि बरच काही, नक्कीच चांगल आहे. पण रस्त्यावरून चालणारे, प्रवास करणारे लोक, महिला, जेष्ठ नागरिक आणि शाळेत जाणारी मूलं यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. शेवटी आर्थिक विकास म्हणजेच सर्व काही नव्हे मग तो राज्याचा असो कि देशाचा, आणि तो सुद्धा होईल कि नाही याचीतरी कोण ग्वाही देऊ शकतो.

Wednesday, March 4, 2015

गोवा




२०१० ऑक्टोबर मध्ये आम्ही चार मित्रांनी गोव्याला जायचं ठरवलं त्यांनतर ४ वर्षांनी या ट्रीपविषयी लिहतोय कारण आधी ब्लॉग लिहित नव्हतो. मुंबई ते गोवा अरत-परत प्रवास, गोव्यात खाण्याची , राहण्याची सोय, वाहन तसेच चार दिवसात फिरण्यासाठी बीच आणि स्पॉटवर घालवायचा वेळ इ. नियोजन  सर्व मलाच बघायचं होत. मित्राने फक्त 'मुंबई ते गोवा' विमानाची चार तिकीट बुक केली होती बाकी सर्व मीच पहात होतो कारण मला गोव्याबद्दल बऱ्यापैकी माहित होते आणि माझ्या कंपनीतील ३ सहकारी तिथलेच होते. मी २००१ आणि २००४ मध्ये आधी दोनवेळा गोव्याला जाऊन आलो होतो. ठरल्याप्रमाणे आमचा एक मित्र पुण्याहून मुंबईला आला आणि आम्ही बाकीचे तिघे मुंबईतच होतो. गोव्याला जाण्याच्या एक दिवस आधी रात्री मला एअरपोर्टवर दाखवण्यासाठी ओळखपत्रच सापडत नव्हते परमनंट अकौंट नंबर कार्ड पाकीटमाराने काही दिवसापूर्वीच लंपास केले होते पण खूप शोध घेतला आणि मतदान ओळखपत्र सापडले. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी विमान उडाले आणि बरोबर ५६ मिनिटांत आम्ही गोव्यात 'देबोलिअम'  एअरपोर्टवर  पोहचलो,  असं वाटलं या एअरपोर्टवर बऱ्याच वर्षांनी विमान उतरल असाव इतकी तुरळक गर्दी होती. थोडा शोध घेऊन एका वाहनाने आणि हॉटेल वर पोहचलो 


कंपनीतील सहकाऱ्याने २ दिवस आधी पणजी शहरामध्ये हॉटेलची रूम  बुक करून ठेवली  होती . सिझन नसल्यामुळे बीचजवळ हॉटेल सहज आणि कमी दरात मिळाले असते पण मुद्दाम पणजी शहरात राहण्याची व्यवस्था केली होती कारण आम्हांला बाईकवरून प्रवास करता यावा तसेच चर्च, मंदिर पाहण्यासाठी फिरता यावे. हॉटेलवर पोहचून आम्ही चारही जणांनी सुस्त ताणून दिली, २ तास आराम केला आणि नाश्ता चहा घेऊन तयार झालो आणि  गोवा दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो हॉटेलमधील एकाने दोन दुचाकीची सोय केली होती एक होंडा एक्टीवा आणि दुसरी सी डी १०० त्यावर चार जणांचा प्रवास सुरु झाला.पहिला कलंगुट बीच निवडला आणि तो पूर्ण दिवस  आम्ही बीचवर होतो. तिथेच दुपारचे जेवण उरकले आणि पुन्हा सनसेट होईपर्यंत बीचवर थांबलो. संध्याकाळी बिचवर थांबणे तितकेसे सुरक्षित नसते याची मला जाणीव होती त्यामुळे तिथून लवकर निघायचे होते अशातच अपेक्षित प्रमाणे एक भामटा आमच्या जवळ आला आणि कमी दरात डिस्कोपब मध्ये प्रवेश देतो म्हणून पैसे मागू लागला पण मी पैसे देण्यास साफ नकार दिला. आधी प्रवेश आणि मग पैसे असा मी पवित्रा घेतला शेवटी त्याने डिस्को प्रवेशाची खरी रक्कम सांगितली आणि डिस्कोच्या स्वागतकशातून आपले कामिशन घेऊन पळ काढला. डिस्को मध्ये रात्री २ वाजेपर्यंत एन्जोय केला आणि हॉटेलवर गेलो.




दुसऱ्या दिवशी आम्ही चर्च, मंगेशी मंदिर पाहण्यासाठी राखीव ठेवला होता आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला आमचा मित्र अरविंद याला निरोप द्यायचा होता त्याप्रमाणे त्याला वास्को येथील रेल्वे स्टेशनवर सोडायच होत. चर्च आणि मंदिर पाहून झाल्यावर  दुपारच्या दरम्यान वास्कोकडे कूच केली वास्को मार्गावर बरीच वाहने चालू होती आणि ती ही  चांगल्याच वेगात होती, अशातच एका मध्य रस्त्यात आम्हाला पोलिसांनी थांबवले मी आणि अमर थांबलो  पोलिस आणि फौजदार आम्हाला लायसेन्स? कोठून आला? आणि कोठे चालला आहात? इत्यादी प्रश्न विचारात होते इतक्यात आमच्या मागून येणारे आमचे परममित्र अरविंद यांना आपली सुसाट वेगाने येणारी एक्टीवा आवरली नाही आणि सरळ फौजदार साहेबांच्या पायावर गाडी चढवली. आणि आमचा मित्र अमर हसू लागला त्यामुळे रागवलेल्या साहेबांनी दंडाची रक्कम तिप्पट केली. शेवटी ५०० रुपये दंड भरला तेही आमच्याजवळ लायसेन्स असताना वाहतुकीचे नियम मोडलेले नसताना. बिनपावतीचा दंड भरून आम्ही वास्को येथील एका साध्या हॉटेलात जेवण केल त्यावेळी मिळालेलं जेवण गोव्यातील आतापर्यंतच सर्वात चांगलं अस वाटलं. कोकणी रस्सा, सोलकढी, ओला फ्राय झिंगा आणि सोबतीला थंड बिअर मस्तच ! जेवण करून अरविंदला रेल्वेने पुण्यासाठी रवाना केले, परतल्यावर त्या रात्री पणजी जवळ क्रुझवर गोव्याच्या पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम' पहिला आणि पहाटेपर्यंत बाईकवरून भटकत राहिलो. 


अरविंद पुण्याला सुखरूप पोहचला होता. आम्ही आता तिघेजण उरले होतो त्यामुळे मला 'दिल चाहता है' सिनेमातले गोव्याला गेलेले तीन मित्र आठवले. त्यातला एक इतर दोघांना उद्देशून म्हणतो कि आपल्याला दरवर्षी एकदा तरी गोव्याला आल पाहिजे तेव्हा दुसरा म्हणतो ' वर्षातून एकदा तर दूर राहिलं पण दहा वर्षातून आपलं एकमेकांशी बोलण होईल कि नाही माहित नाही' त्यावर तिसरा आत्मविश्वासाने उतरतो ' आपण भेटू निश्चित भेटू . आणि ते पुन्हा भेटतात सुद्धा, आमच्याबाबतीत आम्ही अस काही ठरवलं नव्हत. चौथ्या दिवशी वोल्वो बसने आम्ही मुंबईला परतलो. पण जी धमाल गोव्यामध्ये आम्ही केली होती ती न विसरण्यासारखी होती. आज चार वर्षानंतर आम्ही चार जण चार दिशेच्या वेगवेगळ्या शहरात आहोत आमचं बोलण फोनवरून आता सोशल नेटवर्किंगवर आलं आहे. हा काळाचा महिमा आहे पण त्या आठवनी आणि अनुभव आम्ही घेऊन परतलो होतो आणि त्या अधून मधून जाग्या होतात  अगदी जशाच्या तशा.