Monday, February 26, 2018

फटाक्यांचे पोस्टर

साधारण पंच्याऐशी ते नव्वद च्या दशकात माझं आणि समवयीन मित्रांचं फटाके हे दिवाळीतल मुख्य आकर्षण असायचे, आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या समोर मैदानात फटाक्यांची दुकानं लागलेली असायची. सुट्टी दहा बारा दिवस असायची त्यामुळे कधी किल्ला कर तर क्रिकेट खेळ असा आमचा दिवस जायचा मग संध्याकाळी आमचे पाय फटाक्यांच्या दुकानाकडे वळायचे.

एका दिवाळीत एकदाच फटाके मिळायचे तेही  मोजकेच त्यामुळे आम्हाला खुप वेळा फटाके दुरूनच  पाहून समाधान मानावे लागायचे, त्या दुकानात काही मोठे फटाके असणारे  बॉक्स असायचे त्या वर असणारे नट्याची पोस्टर माझं विशेष लक्ष वेधून घेत असत.त्यावेळी हिरोईन ला नटी शब्द जास्त वापरत असत,  पण त्या मध्ये अभिनेत्री श्रीदेवीचा फोटो माझ्या कायम लक्षात राहिला. गडद रंगाची साडी आणि गडद रंगाचं ते बॉक्स, हातात पणतीच ताट आणि तिच्या दोन्ही बाजूला उडणारे फुलबाजे आणि त्यातून तयार झालेल्या कित्येक चांदण्या, ते आणि तसले कित्येक पोस्टर माझ्या स्मरणात तसेच राहिले पुढे जाऊन ती चित्रपट सृष्टीत चांदणी या  चित्रपटात चमकली. नव्वद चा दशक संपून कित्यके अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण अजून ही  कित्येक फटाक्यांच्या बॉक्स वर श्रीदेवीच स्थान अजूनही अढळ आहे, काल वयाच्या ५४ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. एक बालकलाकार ते  एक सशक्त अभिनेत्री असं जेवढं  आयुष्य मिळालं ते एक कलाकार म्ह्णून जगलं, ते ही सुमारे ३०० चित्रपटात काम करून. गुगल वर खूप शोध घेतला पण ते पोस्टर मिळालं नाही पण त्याच्याशी मिळतं जुळतं एक पोस्टर इथे ठेवून या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रदांजली अर्पण करतो. 

Thursday, June 1, 2017

रंजस



मागचा लेख जुलै महिन्यात लिहला होता त्यानंतर एक वर्षांनी हा लेख लिहीत आहे, तर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात  पावसाची सुरुवात होते. म्हणजे  एखादे शहर, छोटे नगर किंवा खेडेगाव असो कि वाडी- वस्ती, पाऊस सुरवातीला सगळ्यांना सळो कि पळो करून सोडतो. पाऊस चांगला दोन आठवडे लागला कि बरेच लोक त्या पावसाळी वातावरणात रुळलेले असतात. लोकांचे वागणे- बोलणे त्या पावसाळी वातावरणाला साजेसे असते पण समाजात काही असे तरुण लोक असतात त्या पावसाने त्यांच्या चेहऱ्यावर एक अवकळा आणलेली असतो तिला मी नाव दिलं  'रंजस'

काय आहे हे रंजस प्रकरण ? एका प्राध्यापिकेने सहज वापरलेला शब्द माझ्या चांगलाच लक्षात राहिला. मी कधीही मराठी शब्दकोषात त्याचा अर्थ किंवा वर्णन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण हा शब्द मला फक्त जून किंवा जुलै महिन्यात आठवतो आणि लगेच विसरूनही जातो. माझा एक मित्र जो स्टुडन्ट अँड टीचर काउन्सेलर आहे, तो आणि मी जेव्हा प्रेमभंग या विषयावर बोललो तेव्हा हा 'रंजस' शब्द अचानक माझ्या तोंडून आला. त्यावर आम्ही वेगवेगळे संदर्भ देऊन चर्चा केली आणि शक्यतो पावसाळ्यात येणाऱ्या एका ठराविक लोकांच्याचेहऱ्यावरच्या भावाला हे नाव दिले.

    'रंजस'  म्हणजे चेहऱ्यावर दिसणारी नाराजी, मग प्रश्न पडतो कि पावसाळ्यातच का पसरते चेहऱ्यावर अशी नाराजी, जून आणि जुलै मध्ये पाऊस खूप पडत असतो त्यावेळी रस्त्यावर आणि घराबाहेर लोक कमी दिसतात, एकतर ते घरी किंवा कामाच्या ठिकाणी असतात अशावेळी एकाकी असणारे लोक अजून एकाकी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तोच 'रंजस' भाव प्रकट होतो. त्याला मुख्य करून प्रिय व्यक्तीचा विरह हे एक कारण असते, मग तो मित्र -मैत्रीण किंवा नातलग  असो, माझा मित्र आणि मी अशा काही लोकांशी बोललो आणि त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप जवळच्या लोकांशी झालेली ताटातूट हेच जास्त प्रमाणात मोठे कारण होते. यामध्ये तरुण वयात अनपेक्षितरित्या झालेला प्रेमभंग जास्त कारणीभूत असावा असं मला वाटतं. पुरुष हे सर्वाधिक 'रंजस' असतात कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हळवे असतात तर स्त्रिया सहनशील

काळीज पिळवटून टाकणाऱ्या आठवणी येणं त्यावेळी जवळ आपलं कोणीही नसणं त्यात पाऊस हा शक्यतो प्रेमाचा साक्षीदार किंवा प्रेमभावना उत्पन्न करणारा असतो अशी कुमारवयांपासूनची शिकवणूक कथा -कवितांमधून झालेली असते त्यामुळे तो एकाकी व्यक्ती मोकळेपणाने बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकला नाही तर अशी भावना चेहऱ्यावर दिसते तेच त्यांच 'रंजसपण'. कोणी म्हणेल कामधंदे नसणारे लोक असा विचार करु शकतात किंवा ते अति हळवे असतील पण खरोखर भावनेवर या जगाचा डोलारा उभा आहे नाहीतर यशस्वी होण्यासाठी सकारात्मक भावना जोपासा असं संदेश जगात का फिरला असता, तशीच ही एक नकारात्मक भावना आहे. मानसशात्रज्ञ यावर मिळून मिसळून राहावे किंवा नवीन मित्र जोडावेत असे उपाय देत असतीलही पण तो एक अतीव दुःखाचा अनुभव आहे जो भविष्यकाळासाठी त्या व्यक्तीला कणखर बनवू शकतो, पण त्या एकाकीपणातून तो तरला पाहिजे.    

Monday, July 25, 2016

महानगरातला महासागर

अंधेरी वेस्ट ला आंबोली नाक्याजवळ एक साधे हॉटेल आहे तिथे एका दुपारी ओळखीच्या दोन लोकांसोबत चहा घेत बसलो होतो. मी दोन्ही पाय हॉटेलमधील टेबलाच्या मधल्या दांडीवर ठेवले होते आणि गप्पा मारत बसलो ते अर्धा - पाऊण तास कधी निघून गेला समजले नाही अचानक टेबलाच्या दांडीवरून खाली पाय घसरला आणि पाहतो तर अर्धा फूट पाण्यात पाय पडला. हॉटेलमधे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता  त्यामुळे तिथून आम्ही जवळच असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो तर रस्ता पाण्याखाली केव्हाच गेला होता. ऑफिसच्या गेटजवळ बरेच जण उभे होते आणि ऑफिसचा सुरक्षा रक्षक आम्हाला वर जाण्यास मनाई करत होता, आता घरी जाण्यासाठी निघायची घाई करायची होती पण पुढच्या काही तासात परिस्थिती भयंकर होणार होती याची काहीच जाणीव नव्हती तर फक्त पाऊस जास्त पडतोय असे वाटत होते तो दिवस होता २६ जुलै २००५.  

 ऑफिसच्या गेटबाहेर अर्ध्या फुटांचं पाणी गुडघ्या पर्यंत आले होते आणि लोक एकामागोमाग अंधेरी स्टेशन च्या दिशेने चालत होते, मी पण त्या गर्दीतून चालत काही अंतर चालत राहिलो वरून पाऊस धो-धो पडत होताच, आंबोली नाक्यावरून स्टेशनकडे जाताना अंधेरी ईस्ट ला जाण्यासाठी एक सब-वे आहे तो काहीसा उताराचा भाग आहे त्यामुळे एस व्ही रोड वरून येणारे सर्व पाणी त्या सब-वे मध्ये खूप वेगाने जात होते मला ते धोक्याचं वाटत होते म्ह्णून काही अंतरावर एका दुकानासमोर काही वेळ उभा राहून अंधेरी ईस्टला कोणत्या दिशेने जावं याचा मी विचार करत होतो इतक्यात एक माणूस त्या सब-वे च्या खाली पाण्याच्या वेगाने ओढला गेला आणि क्षणात नाहीसा झाला आता मात्र काय करावे ते सुचेनासे झाले. अशा परिस्थितीत काही लोक पुढे जाण्याचे धाडस करत होते आणि तिथले स्थानिक लोक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते, पण ऐकतील तर ते लोक कसले, शेवटी स्थानिक लोकांनी काठ्या काढून लोकांच्या पायावर मारायला सुरवात केली तेव्हा कुठे लोक मागे वळले आणि पर्यायी रस्ता म्हणून त्यांच्या मागोमाग मी ही आंबोली रेल्वे फाटकाकडे चालत निघालो पण माझ्या डोळ्यासमोर त्या पाण्यात वाहून गेलेल्या माणसाचा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता, नदी किंवा समुद्रात असे प्रकार सर्रास घडतात पण माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर माणुस वाहून जातो अशी ही भयंकर परिथिती होती पण महानगरात आलेल्या पुराचा खरा सामना अंधेरी ईस्ट मध्ये होणार होता. 

आंबोली फाटका जवळ आलो तेव्हा अचानक खिशातल्या मोबाईल ची आठवण झाली घरी आधीच काळजी करू नका म्हणून फोन केला होता, चार वाजेपर्यंत एमटीएनएल सेवा चालू होती तर मोबाईल सेवेने केव्हाच जीव टाकला होता त्याच्या ही स्क्रीनवर महापूर आला होता, मग खिशात फोन टाकून पुन्हा चालायला लागलो, अंधेरी ईस्ट चा भाग खोलात आहे त्यामुळे पावसाचे सर्व पाणी ईस्ट मध्ये जमा होत होते, डोक्यावर पावसाची रिमझिम चालू होती. कसाबसा चालत दीड तासाने नटराज स्टुडिओ जवळ पोहचलो तिथे छातीएवढे पाणी लागले तरी लोक चालत होते आणि मी ही मागोमाग पंढरीच्या वारीला निघाल्यासारखा चालत होतो फक्त पोहता येत होते याच विश्वासावर. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळ थोडा उंच भाग आहे तिथे पाणी कमी होते मग दहा मिनीटे तिथे थांबून पुन्हा चालायला सुरवात केली पुढे गेल्यावर एक स्कुलबस अर्धी पाण्यात उभी होती आणि पंचवीस तीस लहान मुले केविलवाण्या नजरेने महापूर पहात होती जवळच एक केळीचा गाडा तरंगत होता त्यातील काही केळी बरोबर चालत असणाऱ्या एका व्यक्तीने बसमधील मुलांना दिली. शेवटी पाण्यातून चालण्याचा वैताग आला आणि दुभाजकावर चढून चालू लागलो. चकाला -जेबी नगर  एयरपोर्ट मार्गे कधी पाण्यातुन कधी दुभाजकावरून चालत मरोळ मध्ये पोहचलो. मुंबईची जी अवस्था झाली होती ती सर्वानीच टी व्ही वर पहिली. पण मी चार तास पाण्यातून चालत सुखरूप पोहचलो तेव्हा आयुष्यात पहिला महापुराचा अनुभव घेऊन आलो होतो. आज या घटनेला अकरा वर्ष पूर्ण झाली.      

Thursday, July 14, 2016

उलटा धबधबा - सडावाघापूर

विस्तीर्ण अशा पठारावर प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा आणि समोर कोणत्याही डोंगर-पर्वताचा अडसर नाही त्यामुळे धबधब्यावर पडणारा वाऱ्याचा दाब त्यातून निर्माण झालेला 'रिव्हर्स' - किंवा उलटा धबधबा. पुणे -बेंगलोर हायवेवर साताऱ्यापुढे उंब्रज हे गाव आहे या गावाजवळून २३ किलोमीटर सडावाघापूर हे पठारावर लहानसे गाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर हा पठाराचा भाग 'मिनी महाबळेश्वर' म्ह्णून ओळखला जातो. आजूबाजूला सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा आहेत,पठारावर प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे काही निमुळत्या ठिकाणी हे पाणी एकत्र येऊन उलटे धबधबे तयार झाले आहेत.
                 सडावाघापूर हे सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ठिकाण आहे तिथूनच ४० कि. मी. अंतरावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे 'कोयना' धरण आहे महाराष्ट्राला वरदान ठरलेला जलविद्युत प्रकल्प आहे. कोयनेवरून पुढे चिपळूण -डेरवण तसेच  रत्नागिरीचा कोकण भाग पर्यटनासाठी खुणावतो. सोसाट्याचा वारा आणि पाऊस अनुभवायला सडावाघापूर ला जरूर भेट दया.            


Saturday, July 2, 2016

दर्शन

सव्वापाच च्या सुमारास पाऊस बंद झाला आणि श्रावणात पडतो तसा सूर्यप्रकाश पडला होता, दिवस मावळायला अजून तासभराचा तरी अवकाश होता मग छत्री न घेताच टेकडीवर जाण्यासाठी बाहेर पडलो. ही टेकडी म्हणजे मध्यम उंचीचा डोंगरच, गावापासून साधारण दोन किलोमीटर दूर अशा  या टेकडीवरून आमच्या शहराचा वेध घेण्यासाठी अतिशय सूंदर स्थान आणि आजूबाजूच्या खेड्यांचे नदीचे आणि दूरवर असणाऱ्या उंच किल्ल्याचे दर्शन येथून व्यवस्थित होते.

पायी पायी टेकडीजवळ पोहचलो तेव्हा पठारावरच्या पवनचक्की चे कर्मचारी मोटारसायकल आणि जीपने परतत होते त्यामुळे पंधरा-वीस मिनिटे वाहनांची घरघर चालू होती काही वेळाने वातावरणात शांतता पसरली. टेकडीवरचा सर्व भाग ओलसर, हिरवागार आणि  स्वच्छ दिसत होता, उन्हात सूर्याजींच्या झळांनी पिवळे झालेले गवताचे आच्छादन हिरवे आणि प्रफुल्लीत होऊंन वाऱ्यामुळे डोलत होते. पाऊस नुकताच थांबला होता त्यामुळे टेकडीवर बोटाएवढे पाण्याचे छोटे प्रवाह वाहत होते. एका मध्यम आकाराच्या दगडावर बसून समोर जे जे दिसेल ते पाहण्याच्या प्रयत्न करू लागलो पण नजरेच्या आवाक्या बाहेरचे विहंगम दृश्य पाहता पाहता नजर स्थिर होत नव्हती  पश्चिमेला डोंगर आणि ढगांची युती झाली होती,  ढग आणि डोंगर माथ्यावरून बाहेर पडणारी तिरपी सूर्यकिरणे यामुळे एका बाजूच्या निरभ्र आकाशात लखलखीतपणा आला होता. 

शहरातच्या मध्यभागात कचेरी,महाविद्यालय आणि नदीजवळच्या लक्ष्मीमातेच्या मंदिराचे झाडांमधून दर्शन होत होते. गावाच्या दोन्ही बाजूला दोन नागमोडी नदया आणि एका वळणावरचा झालेला संगम, आणि नदीच्या मार्गावर रांगेत उभी असणारी अशोका आणि निलगिरीची झाडं पाहून असं वाटलं अजून कशाची कमी असावी.  नदीपलीकडे सात-आठ  खेडेगाव आणि छोटया वाड्या वस्त्या आहेत,  मावळत्या सूर्याचा प्रकाश ढगांच्या भगदाडातून एका छोट्या गावावर पडत होता. डोंगराजवळ धुके दाटले होते त्यामध्ये काही गावं हरवली होती. गावातल्या घरांचे पत्रे आणि कौलारू छ्प्पर लक्ख उठून दिसत होते. कौलांच्या मधून बाहेर पडणारा चुलीचा धूर हे दृष्य खूप विलक्षण वाटत होते तिथल्या शांत मानवी अस्तित्वाची जाणीव करून देत होते.       

एव्हाना सूर्य डोंगराआड लपून गेला होता हवेतला गारवा अंगाला चांगलाच जाणवायला लागला होता पण समोरचं निसर्ग रुप पाहून माझी समाधीच लागली होती. इतक्यात एक म्हैस घेऊन चाललेल्या आजोबांचा आवाज कानावर आला 'ओ पाव्हणं, पाऊस ईल आता बघा हिकडं भरून आलंय' आणि मी हसून 'आव मी पाव्हना नाही इथंच गावातला आहे, मुंबईला असतो' असं म्हणालो. आजोबा ही हसले आणि ' तस न्हाय निघा लवकर आता अंधार बी पडल असं म्हणाले. आणि मी ही परतीची वाट धरली आणि मनात विचार आला काही दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखी असतात पण काहीवेळा त्यांना मनातच आणि स्मृतीत बंदिस्त करण्यात काही औरच मजा असते. चालताना नदीजवळच्या मंदिरातून संद्याकाळच्या हरिपाठाचे सूर कानी पडत होते. 
                                                           जय जय राम कृष्ण हरी 
                                                           जय जय राम कृष्ण हरी

Wednesday, June 8, 2016

वरुण मला माफ कर !

मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. मला पूर्वीचे दिवस आठवतात अजून शाळेत जाताना झोडपून काढायचास. खूप गरम होतंय आता सहन नाही होत, दुपारी जमीन तापते अंगाची लाही लाही होते. मला माहित आहे मी कशाच्या आधारावर तुझी विनंती करणार अजून आयुष्यात साधं एक रोपपण नाही लावलं, पण आम्हाला निसर्गाकडून सर्व काही फुकटात घ्यायची सवय आहे. आजूबाजूला उंचच उंच इमारती दिसतात त्याचं कौतुक वाटत पण एखादा डवरलेलं झाड दिसत नाही त्याची खंत वाटत नाही, हे असले आम्ही !
                     विहरी आटल्या, ज्या धरणाची भिंत पाहून पोटात भीतीचा गोळा यायचा तिथला तळ दिसतोय. नदीच्या बाजूची हिरवीगार शेती आता उजाड दिसतेय. वणवण भटकून सुद्धा आता पाणी मिळत नाही शेती तर इतिहासजमा झाली.  कुटुंब च्या कुटुंब गाव सोडून शहरात येताहेत. शहरातल्या स्टेशनवर बस थांब्याजवळ तर कधी रस्त्यात म्हातारे आजी आजोबा भिक मागताना दिसतात. आता तुला वरुण राजा म्हणतो सांग ते भिकारी आहेत का ? पांढरा सदरा  धोतर गळ्यात तुळशीची माळ कपाळावर अष्टगंध, हाथ पसरणारा आपला नवरा पाहून नजर चोरणाऱ्या लुगड नेसलेल्या आणि खांद्याला पिशवी अडकवलेल्या आजी पण आता हाथ पसरू लागल्या आहेत. जगण्याच्या लढाईत तहान - भुकेने शरमेवर मिळवलेला विजय आहे तो !

                       मला बाकीच्या लोकांचे काहीच माहित नाही पण गावच्या शेतात् किमान पंचवीस झाड लावण्याचा माझा विचार आहे आणि त्या झाडांच्या जोपासनेची व्यवस्था  एवढा वेळ नक्की मिळेल. पण त्यासाठी तुला  मुसळधारपणे यावं लागेल म्हणून सांगतो>>>>>> मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. वरुण मला माफ कर !   

(आपण ही पोस्ट वाचताना आजपर्यतच्या आयुष्यात किमान एक वृक्ष लावला असेल तो वाढवला असेल तर किंवा लावणार असाल तर hemant_hemdeep@rediffmail.com वर आपला अनुभव कळवा, किवा अभिप्राय लिहा)

Monday, May 23, 2016

कि -चेन

"ऐ तिथं हाथ लाऊ नको" अशा अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने तीन वर्षाचे मुल दचकले आणि  फोटोसमोरचे उचलेले फळ तिथेच ठेऊन त्याने रडायला सुरुवात केली, मागून त्याची आई आली आणि  मुलावर ओरडणारी वयस्क व्यक्ती काही बोलण्याआधी मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला तिथून घेऊन गेली. मोबाईल आणि वर्तमानपत्रात माना घातलेली सात-आठजण  मात्र एक नजर टाकून पुन्हा काही-बाही वाचण्यात गुंग झाली. त्यांच्या साठी तो एक शोर्ट ब्रेक असावा. घराच्या मोकळ्या आवारात झाडाखाली हार घातलेल्या आणि अगरबत्ती लावलेल्या फोटोच्या डाव्या बाजूला आठ-दहा आणि उजव्या बाजूला तेवढ्याच खुर्च्या मांडल्या होत्या. खाली सतरंजीवर काहीजण बसले होते. मध्यभागी वर्तमानपत्राचे काही अंक ठेवले होते, त्यातले काहीजण पुन्हा -पुन्हा त्याच बातम्या वाचत होते. दोघेजण आपसांत लांबलेल्या पावसाविषयी एकमेकांना एकू येईल अशा आवाजात चर्चा करत होते, तर चारजण कॉलेजला जाणारा मुलगा अपघातात कसा गेला ?,  दोन वर्षांपूर्वीच आजारात आई गेली आणि आता तरुण वयात हा मुलगा गेला म्हणून  हळहळ व्यक्त करत होते.  तिथूनच थोड्या अंतरावर काही बायका जमलेल्या माणसाच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या, त्यामध्ये एक साठी उलटलेले गृहस्थ स्वयंपाक चविष्ट होण्यासाठी आचारयाला सूचना करत होते तेवढ्यात त्या गृहस्थांच्या पत्नीने त्यांच्यावर डोळे मोठे करून पहिले आणि हा स्वयंपाक तेरावीचा आहे आणि तो हौसेने चालला नाही याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या सूचना बंद केल्या.

काहीवेळाने एक मध्यमवयीन स्त्री फोटोजवळ येउन गळा काढून रडू लागली त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईल आणि वर्तमानपत्रातल्या माना वर झाल्या. अपघातात गेलेल्या मुलाचे वडील त्या स्त्रीचं सांत्वन करत तिला घेऊन ते घरात गेले. आता जवळपास सर्व नातेवाईक आणि ओळखीचे आजू बाजूचे लोक जमले होते. एक व्यक्ती चार फुले आणि चंदनाची पाने सर्वांच्या हातात देत होता. सर्वांनी पुढे होऊन ती पाने -फुले फोटोसमोर ठेऊन आपली श्रद्धांजली वाहिली. तिथेच जागा मोकळी करून लोकांना जेवण वाढण्याची व्यवस्था तीन-चार तरुण करत होते, जमलेले नातेवाईक आणि ओळखीचे लोक मान खाली घालून जेवत होते , सर्व लोकांची आणि घरातील बायकांचे जेवण उरकले होते, तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. सर्व जमलेले लोक आपापल्या घरी गेले होते आता घराच्या मागच्या बाजूला घरातील मोजक्या स्त्रिया घरातल्या चर्चा बसल्या होत्या तर पडवीत पुरुष लोक आराम करत होते. घराच्या बाहेरील आवारात जिथे फोटो ठेवला होता तिथे जवळच एक आजोबा झोपले होते. काही वेळाने घरातल्या एका मोठ्या मुलाने तो फोटो उचलून घरात नेउन ठेवला, घराजवळ एक भयान शांतता पसरली त्या शांततेला भेदणारा एक कोकिळेचा आवाज मधून मधून येत होता, पण ते दुसऱ्या कोणाला मंजुळ वाटणारे स्वर कोणा एका व्यक्तीला क्लेशदायक वाटत होते. गेलेल्या व्यक्तीच्या घरापासून चार घर सोडून आपल्या वरच्या मजल्यावरून गेले तेरा दिवस त्या व्यक्तीचे डोळे त्या फोटोचा वेध घेत होते. आता त्या फोटोची जागा रिकामी झाली होती. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आठवणी होत्या, दुख गळ्यापर्यंत दाटून आल होते पण त्या दुखाला मोकळे होण्यासाठी अश्रूंची वाट पुरेशी नव्हती, तिला वाटत होत एकदाच ओरडून रडून घ्यावं पण का ? कधीपासून? असल्या प्रश्नांना द्यायला उत्तरं तिच्याकडे नव्हती. तो या जगात होता तोपर्यंत तिला पहिल्या भेटीच्या आठवणी मोहरून टाकायच्या पण त्याच आठवणी आता जीवघेण्या वाटत होत्या. त्याने  प्रेमाची पहिली भेट म्हणून दिलेले  एक कि-चेन तिच्याकडे होते त्यात रंगीत पाण्यात एक बाहुला आणि बाहुली एकमेकांना मिठी मारून गोल गोल फिरत होते. त्या वस्तूचा स्पर्श आता आयुष्यात जीवघेण्या रिकामेपणाची जाणीव करून देत होता.