अंधेरी
वेस्ट ला आंबोली नाक्याजवळ एक साधे हॉटेल आहे तिथे एका दुपारी ओळखीच्या दोन लोकांसोबत
चहा घेत बसलो होतो. मी दोन्ही पाय हॉटेलमधील टेबलाच्या मधल्या दांडीवर ठेवले होते आणि
गप्पा मारत बसलो ते अर्धा - पाऊण तास कधी निघून गेला समजले नाही अचानक टेबलाच्या दांडीवरून
खाली पाय घसरला आणि पाहतो तर अर्धा फूट पाण्यात पाय पडला. हॉटेलमधे सर्वत्र पाणीच पाणी
झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे
तिथून आम्ही जवळच असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो तर रस्ता पाण्याखाली केव्हाच
गेला होता. ऑफिसच्या गेटजवळ बरेच जण उभे होते आणि ऑफिसचा सुरक्षा रक्षक आम्हाला वर
जाण्यास मनाई करत होता, आता घरी जाण्यासाठी निघायची घाई करायची होती पण पुढच्या काही
तासात परिस्थिती भयंकर होणार होती याची काहीच जाणीव नव्हती तर फक्त पाऊस जास्त पडतोय
असे वाटत होते तो दिवस होता २६ जुलै २००५.
ऑफिसच्या
गेटबाहेर अर्ध्या फुटांचं पाणी गुडघ्या पर्यंत आले होते आणि लोक एकामागोमाग अंधेरी
स्टेशन च्या दिशेने चालत होते, मी पण त्या गर्दीतून चालत काही अंतर चालत राहिलो वरून
पाऊस धो-धो पडत होताच, आंबोली नाक्यावरून स्टेशनकडे जाताना अंधेरी ईस्ट ला जाण्यासाठी
एक सब-वे आहे तो काहीसा उताराचा भाग आहे त्यामुळे एस व्ही रोड वरून येणारे सर्व पाणी
त्या सब-वे मध्ये खूप वेगाने जात होते मला ते धोक्याचं
वाटत होते म्ह्णून काही अंतरावर एका दुकानासमोर काही वेळ उभा राहून अंधेरी ईस्टला
कोणत्या दिशेने जावं याचा मी विचार करत होतो इतक्यात एक माणूस त्या सब-वे च्या खाली पाण्याच्या
वेगाने ओढला गेला आणि क्षणात नाहीसा झाला आता मात्र काय करावे ते सुचेनासे झाले. अशा
परिस्थितीत काही लोक पुढे जाण्याचे धाडस करत होते आणि तिथले स्थानिक लोक त्यांना थांबविण्याचा
प्रयत्न करत होते, पण ऐकतील तर ते लोक कसले, शेवटी स्थानिक लोकांनी काठ्या काढून लोकांच्या
पायावर मारायला सुरवात केली तेव्हा कुठे लोक मागे वळले आणि पर्यायी रस्ता म्हणून त्यांच्या
मागोमाग मी ही आंबोली रेल्वे फाटकाकडे चालत निघालो पण माझ्या डोळ्यासमोर त्या पाण्यात
वाहून गेलेल्या माणसाचा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता, नदी किंवा समुद्रात असे
प्रकार सर्रास घडतात पण माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर माणुस वाहून जातो
अशी ही भयंकर परिथिती होती पण महानगरात आलेल्या पुराचा खरा सामना अंधेरी ईस्ट मध्ये
होणार होता.
आंबोली
फाटका जवळ आलो
तेव्हा अचानक खिशातल्या मोबाईल
ची आठवण झाली
घरी आधीच काळजी
करू नका म्हणून
फोन केला होता,
चार वाजेपर्यंत एमटीएनएल
सेवा चालू होती
तर मोबाईल सेवेने
केव्हाच जीव टाकला
होता त्याच्या ही
स्क्रीनवर महापूर आला होता,
मग खिशात फोन
टाकून पुन्हा चालायला
लागलो, अंधेरी ईस्ट चा
भाग खोलात आहे
त्यामुळे पावसाचे सर्व पाणी
ईस्ट मध्ये जमा
होत होते, डोक्यावर
पावसाची रिमझिम चालू होती.
कसाबसा चालत दीड
तासाने नटराज स्टुडिओ जवळ
पोहचलो तिथे छातीएवढे
पाणी लागले तरी
लोक चालत होते
आणि मी ही
मागोमाग पंढरीच्या वारीला निघाल्यासारखा
चालत होतो फक्त
पोहता येत होते
याच विश्वासावर. वेस्टर्न
एक्स्प्रेस हायवे जवळ थोडा
उंच भाग आहे
तिथे पाणी कमी
होते मग दहा
मिनीटे तिथे थांबून
पुन्हा चालायला सुरवात केली
पुढे गेल्यावर एक
स्कुलबस अर्धी पाण्यात उभी
होती आणि पंचवीस
तीस लहान मुले
केविलवाण्या नजरेने महापूर पहात
होती जवळच एक
केळीचा गाडा तरंगत
होता त्यातील काही
केळी बरोबर
चालत असणाऱ्या एका व्यक्तीने
बसमधील मुलांना दिली. शेवटी
पाण्यातून चालण्याचा वैताग आला
आणि दुभाजकावर चढून
चालू लागलो. चकाला -जेबी नगर एयरपोर्ट
मार्गे कधी पाण्यातुन
कधी दुभाजकावरून चालत
मरोळ मध्ये पोहचलो.
मुंबईची जी अवस्था
झाली होती ती
सर्वानीच टी व्ही
वर पहिली. पण
मी चार तास
पाण्यातून चालत सुखरूप
पोहचलो तेव्हा आयुष्यात पहिला
महापुराचा अनुभव घेऊन आलो
होतो. आज या
घटनेला अकरा वर्ष
पूर्ण झाली.