Tuesday, July 15, 2014

एक तास कॉलेज बरोबर

तो जूनचा दुसरा आठवडा असावा, कॉलेजवर जाऊन निवांत आणि ते ही एकांतात बसावं असं ठरवूनच संध्याकाळी चारच्या सुमारास  घरातून बाहेर पडलो. वातावरणात गारठा  होता यावेळी पाऊस लवकर सुरु झाला होता त्यामुळे बरीचशी हिरवाई सुद्धा तयार झाली होती, मुळातच आमच्या भागाला निसर्गदत्त देणगी मिळाली असल्याने चांगलं वर्णन करण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या. बाजूला असणारे डोंगर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे  आणि अधूनमधून दिसणारी शेती, छोटे छोटे पाट आणि त्यातून खळाळणार पाणी,  घरापसुन विसेक मिनिटांच्या अंतरावर एका टेकडीवर कॉलेजचा परिसर आहे. कॉलेज पूर्ण होऊन जवळपास तेरा वर्षे उलटली होती त्यामुळे तिथल्या परिसरात काय काय बदल झाले असतील याविषयी मनात खूप उत्सुकता होती. पण एक दुख: पण वाटत होत कि आपले मित्र, मैत्रिणी कोणी कोणीच भेटणार नाही. पण तरीही चालत राहिलो आणि काही वेळाने टेकडी चढून गेल्यावर मोठ्या पटांगणातून पुढे गेल्यावर कॉलेजच मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पोहचलो.

प्रवेशद्वार अलीकडेच बनवल्यासारख वाटत होत, तो रविवार असल्यामुळे गेट बंदच होत पण एका बाजूने आत जाता येईल एवढी जागा होती तिथून आंत शिरलो डाव्या बाजूलाच ग्रंथालय आणि बास्केट बॉलच एक मैदान आहे, पहिल्यांदा तिकडेच वळलो कारण जुनी सवयच होती तशी त्याबाजूचा परिसर मला आवडायचा. ग्रंथालयाच्या बाहेर चार पाच पायऱ्या होत्या ती आमची हमखास बसायची जागा होती तिथेच बसलो आणि लगेच कॉलेजचे दिवस डोळ्यांपुढे येऊ लागले. पाच वर्षे ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचं एक एक करून चित्र डोळ्यांसमोर उभ राहू लागले.आमचा मुल आणि मुली मिळून असा एक ग्रुप होता सगळेजण मिळून शक्यतो  बास्केट बॉलच्या मैदानाजवळ एका झाडाखाली आम्ही बसत असू ते झाड आणि तिथली जागा होती तशीच दिसत होती, बाजूला फक्त काही इंग्लिश आणि मराठी मध्ये पाट्या लावल्या होत्या फळझाडे किवा फुले कोणी तोडू नये म्हणून आणि काही नवीन फुल झाडे पण तिथे लावली होती. तिथेच कम्पाउंड बाहेर एक छोटेस हॉटेल होत ते आता बंद झाल असाव आणि जवळच पटांगणात मोठ क्यनटीन उभारल होत, पूर्वी असणारे शेड सुद्धा गायब झाले होते. बाजूला तीन नव्या इमारती दिमाखात उभ्या होत्या. तिथे अजून एक पटांगण होत जवळपास सत्तर टक्के परिसर पूर्ण बदलून गेला होता. आमच्या वेळचे बरेचसे प्राध्यापक प्राध्यापिका रिटायर्ड झाल्या होत्या. त्यामुळे ओळखीचे मोजकेच लोक राहिले होते.      

बास्केट बॉल च्या मैदानापासून थोड्या अंतरावर कॉलेजची मुख्य इमारत आहे. तिथेच आमचा शेवटच्या वर्षांचा क्लास भरत असे,  माझा मोर्चा मी तिकडे वळवला आणि इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो, जिथे आम्ही शेवटच्या वर्षातली मैत्री,अभ्यास सर्व काही अनुभवलं होत, सर्व वर्ग बंद होते अख्ख्या कॉलेजमध्ये कोणी नव्हते. वातावरणात एक खूप शांतता होती, वाऱ्याचा मध्यम घोंगावणारा आवाज येत होता क्लास समोर थोडा वेळ थांबलो आणि सर्व  जुन्या आठवणी अजूनच ताज्या झाल्या, क्लासच्या मागच्या खिडकीतून म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला दीड - दोन किलोमीटरवर एक नदी आहे ती  खिडकीतून पाहायला मला खूप आवडायची पावसाळ्यात त्या नदी जवळचा परिसर खूपच सुंदर दिसतो खूपवेळा तो सुंदर नजारा मनामध्ये साठवून ठेवला होता, इतका कि सहज आठवण काढावी आणि डोळ्यासमोर चित्र उभे राहावे. खिडकीजवळून येणारा सोसाट्याचा वारा आणि पाऊस अगदी शब्दात न सांगता येण्यासारखं दृश्य असायचं ते.
   
पण हे सर्व कुठेतरी हरवलं होत ते मित्र सुद्धा हरवले होते आपआपल्या मार्गस्थ झाले होते, मी हि त्यांच्यापैकीच होतो. फरक एवढाच होता कि पुढे जाताना कॉलेज आणि त्या मित्रांचा विसर पडू दिला नव्हता म्हणून थोड्या वेळासाठी का होईना जुन्या आठवणीत रमण्यासाठी मी पुन्हा इथे आलो होतो. कॉलेज संपता संपता दरवर्षी न चुकता भेटायचं अस ठरवलं होत पण तस काहीच झाल नाही. मग माझ्या मनात काही प्रश्न आले कि जे मित्र विसरले ते अशा कोणत्या मोठ्या यशाच्या मागे धावत असतील आणि तसं असेल तर खरच त्यांना काही गवसलं असेल का ? त्यांना सुद्धा आपली आठवण होत असेल का?  आणि हे जवळपास सर्वच कॉलेजच्या मित्र - मैत्रीनीन बद्दल घडत असेल का? मनात आलेले बरेच प्रश्न झटकले आणि गेटच्या दिशेने चालू लागलो, पुन्हा वारंवार कॉलेजची भेट होणारच होती फक्त दिवस आणि वेळ पक्की नव्हती. 



No comments:

Post a Comment