Thursday, July 31, 2014

हरवलेल्या वाटा

आम्ही कॉलेजच्या व्हरांड्यात बोलत असताना मधूनच 'तो' निघून गेला 'ती' म्हणाली 'हा जरा विचित्र असल्यासारखा का आहे ? मी म्हणालो 'हो आहे जरासा तरीही तो आपला मित्र आहे, आणि तूच तर एकदा बोलली होतीस कि एखाद्या व्यक्तीला गुणदोषासाहित स्वीकारायचं, आणखी तसच काहीतरी.' ती म्हणाली ' हो ते पण आहे'. पुढे कॉलेजच शेवटच वर्ष संपल आणि सर्वजनण आप-आपल्या मार्गाला लागले. संपर्क कमी होत गेला आणि जवळपास अर्ध्या जणांचा संपर्क तुटला.

'तो' आणि त्याची 'ती' काही वर्ष भेटत राहिले, पुढे तिचंही लग्न झालं आणि त्यांचाही संपर्क तुटला गेला, मधल्या काही वर्षात पुण्याला जाणं होत असे तेव्हा त्याची भेट व्हायची, एका ग्लास कंपनीत जॉबला आहे म्हणाला, जरा जास्तच इमोशनल झाल्यासारखा वाटायचा, सारखं तिच्याविषयी विचारायचा आणि मी 'संपर्कात नाही रे ती !' अस म्हणून टाळून द्यायचो. असाच तीन, चार वर्षे प्रत्येक खेपेला भेटायचा. दरवेळी तिच्याशी एकदा तरी बोलायचं आहे अस बोलायचा. पण तिच्या आयुष्यात काही अडचणी नको होत्या म्हणून मी हि त्याच्यासाठी काही प्रयत्न केला नाही.


'तो' त्याच्या धुंदीत वगैरे कधीच नव्हता, एकलकोंडा पण नव्हता पण बोलायचा फार कमी, अंतर्मुख असल्यासारखा पण  नाही वाटायचा, तिच्यावर फार प्रेम करायचा, पण तिने आपला मार्ग निवडला होता, तिला स्वताच्या संसाराची काळजी होती तिच्या दृष्टीने सर्व संपल होत आणि तो मात्र अजूनही भूतकाळात जगत होता, त्यानेही काही वर्षानंतर लग्न केलं. त्याचही सर्व सुरळीत चालू झाल, पुन्हा पुण्याला गेलो तेव्हा त्याच्या घरी गेलो त्याची बायको पण होती, यावेळेस 'ती 'च्याबद्दल एकही शब्द बोलला नाही. असं वाटल झालं ! एकदाचा हा पण स्वतःच आयुष्य जगायला शिकला. पुन्हा एका वर्षांनी हा संपर्कात राहिला नाही त्याचा एक गावाकडचा मित्र अधून मधून संपर्कात होता मी त्याची चौकशी त्याच्याजवळच करीत असे, त्याच्याकडून समजले त्याला एक छान मुलगी झाली आणि आता तो गावीच असतो गावची शेती भरपूर आहे, घरचे विभक्त झाल्यामुळे त्याने गावीच राहायचा निर्णय घेतला होता. जवळच्या एक ज्युनिअर कॉलेजवर शिकवायचा.



एका सकाळी कधी नव्हे तो त्याच्या मित्राचा फोन आला, त्यामुळे कोणास ठाऊक पण फोन उचलायच्या आधीच मनांत शंकेची पाल चुकचुकली, मित्राने सांगितले ' काल रात्री एका जीपने त्याला उडवले आणि हॉस्पिटल मध्ये भरती करण्या आधीच तो गेला' त्याच्या अशा प्रकारे जाण्याची बातमी ऐकून डोक सुन्न झालं. नक्की काय झाल होत त्याची चौकशी केली, फार वाईट वाटलं मी आमच्या जवळच्या मित्रांना कळवतो अस सांगून फोन ठेऊन दिला आणि जवळच्या तीन चार मित्र आणि मैत्रिणींना कळवले सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. प्रश्न होता जिच्यावर तो प्रेम करत होता तिला कळवण्याचा, पण ते सहज शक्य नव्हते ती कोणाच्या संपर्कात नव्हती.


चारेक महिन्यांनी जवळच्या मैत्रिणीने तिला फोन केला आणि न राहून 'तो अपघातात गेला' असं सांगितले, पण 'ती' म्हणावी तेवढी दुखी झाली नाही दोन मिनिटातच तिने त्याच्याविषयीची माहिती घेऊन विषय बदलला, हे जेव्हा मला समजलं अस वाटलं प्रेमाबरोबर माणुसकी सुद्धा संपते का? एकेकाळी मैत्री आणि प्रेम याबद्दल भरभरून लिहणारे, वाचणारे आणि बोलणारे असे कोरडे ठाक का पडतात, एवढा संकुचितपणा येतो कसा ? कदाचित व्यवहारी जगाचा नियम 'ती' काटेकोरपणे पाळत असावी. 'तो' मात्र शेवटपर्यंत हेच समजत राहिला असावा कि 'ती' मला कधीच विसरली नाही

Tuesday, July 15, 2014

दिल्ली ते गंगानगर

राजस्थान मध्ये श्री गंगानगर या जिल्हयाच्या ठिकाणी एका जवळच्या मित्राचं लग्न होत.  मी आणि माझा एक मित्र आनंद दोघांनी मित्राच्या लग्नाला जायचा बेत आखला. दिल्लीवरून जायचे होते म्हणून राजधानी एक्सप्रेसची तात्कालिक तिकिट बुक केली. दोन दिवसांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राजधानी एक्सप्रेस मुंबई सेन्ट्रल वरून सुटणार होती, म्हणून वेळेआधी आधी दादरला पोहचलो आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे मित्र सुद्धा भेटला गाडीसाठी दोन तास अवकाश होता, मित्र खूप दिवसांनी भेटल्यानंतर गप्पा मारत आम्ही नाश्ता केला आणि प्रवासामध्ये जरुरीचे काही सामान विकत घेतले,  नंतर दादरहून मुंबई सेन्ट्रल गाठले.

रेल्वे मुंबई सेन्ट्रल वरून वेळेत सुटली, डब्यामध्ये खूप सारे यंगस्टर्स होते, त्यामुळे डब्यातले वातावरण 'फ्रेश टाइप' होते. राजधानी ची सेवा सुद्धा अतिशय सुंदर होती, रेल्वे गुजरात जवळ पोहचल्यावर चहा कॉफी घेत गप्पा मारत होतो आणि प्रवासाचा एन्जॉय चालु होता. मधल्या पोर्चमध्ये काही मुल मुली सिगरेटी फुंकत होत्याच. सकाळी नऊ वाजता दिल्ली स्टेशन वर पोहचलो इथे एक मित्र आम्हाला रिसीव्ह करायला आला होता त्याच्या घरी जाऊन फ्रेश झालो आणि दिल्ली पाहण्यासाठी बाहेर पडलो. त्यादिवशी दिल्लीत रामलिला रथ फिरत होते त्यामुळे रस्त्यावर भरपूर गर्दी होती, त्यातून वाट काढत काढत आम्ही चांदणी चौकात पोहचलो तिथे जवळच 'पराठेवाली गल्ली' म्हणुन प्रसिद्ध आहे. तिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे पराठे बनवले जातात. तिथे आम्ही काही पराठे टेस्ट केले आणि तिथून मेट्रो मधून प्रवास करण्यासाठी निघालो. मेट्रो आमच्यासाठी म्हणजे किमान माझ्यासाठी नवीनच होती कारण मी दिल्लीला पहिल्यांदा आलो होतो. दिल्लीत फिरता फिरता पूर्ण दिवस कसा गेला कळलेच नाही. त्याच दिवशी आम्हाला दिल्लीचा निरोप घ्यायचा होता कारण दोन दिवसांनी गंगानगरला मित्राचं लग्न अटेन्ड करायचं होत.                        

दिल्लीमधून रात्री नऊ ते दहाच्या सुमारास स्लीपर कोच खासगी गाडीने जायचे होते, गंगानगर हे तसे पंजाब आणि राजस्थान च्या मधोमध होते आणि ते भारत पाकिस्तानच्या सिमेलगत चे शहर होते. गाडी हरीयानामार्गे जाणार होती जेवण आटोपून आम्ही गाडी पकडली, गाडीमध्ये काही पंजाबी भाषा बोलणारी मंडळी होती. गाडी पूर्ण भरली नव्हती, गाडी तासा-दोन तासात हरियाना मधील 'रोहतक' शहराजवळ आली. मी आणि मित्र स्लीपर कोचमध्ये झोपून गप्पा मारत होतो तेव्हा अचानक आम्ही झोपलेल्या बाजूच्या काचेवर किमान पावकिलो वजनाचा एक दगड येउन आदळला आणि बाजूच्या पूर्ण  काचेचे बारीक तुकडे झाले आणि ते आमच्या शरीरावर उडाले. त्यापैकी काही काचा मित्राच्या हातावर लागल्या होत्या. त्या अचानक झालेल्या हल्ल्याने आम्ही गांगरलो होतो. काही बोलावे काहीच सुचत नव्हते तोपर्यंत गाडी दोन ते तीन किलोमीटर पुढे गेली होती, गाडीच्या ड्राइवरला याची काहीच भनक सुधा नव्हती त्याला आम्ही जबरदस्ती गाडी थांबवण्यास सांगितली आणि खाली उतरून आजूबाजूला पहिले पण जिथे गाडीवर दगड मारला गेला ते ठिकाण मागेच राहील होत त्यामुळे काहीच न बोलता आम्ही गाडीत येउन बसलो आणि ज्या मित्राचं लग्न होत त्याला फोन करून सर्व हकीकत सांगितली त्यानेसुद्धा अस कधीच घडल नव्हत अस सांगितले आणि पोहचण्याची वेळ सांगून आम्ही फोन ठेऊन दिला. काही वेळाने मी आणि बरोबरच्या मित्राने ड्राइवरला बाथरूम ला जाण्यासाठी गाडी थांबविण्याची विनंती केली आणि नेमकी त्याने गाडी एका ढाब्यासमोर थांबवली आणि आमची  बाथरूम ला जाण्याची पंचाईत झाली, पुन्हा आम्ही ड्राइवरला  "कुठे जाऊ ' म्हणुन विचारण्यास  गेलो तर त्याने वैतागून सीटवरूनच मागच्या बाजूला इशारा केला.  मित्र अर्धवट झोपेत होता तो मला गाडीतच बाथरूमची सोय आहे अस म्हणाला मला ते विचित्र वाटल मी म्हणालो  'लग्झरी कोचमध्ये बाथरूमची सोय कशी असू शकते' तर तो मला म्हणाला 'रुक मै देखके आता हु' आणि तो गाडीमध्ये आत जाऊन अगदी मागच्या बाजूला गेला तर तिथे अजून एक स्लीपर आसन होत तिथे एक माणूस पण झोपला होता आणि ते पडदे लावल्यामुळे एखाद्या बाथरूम सारखे दिसत होते, ते पाहून आम्हाला खूप हसायला आले आणि नंतर समजले कि  ड्राइवरला गाडीमध्ये नव्हे तर गाडीच्या मागे म्हणजे रस्त्यावर जाण्यासाठी इशारा करायचा होता, त्यावेळी आंम्हाला अक्षरश: हसू आवरत नव्हते  आणि हा विनोद आठवून आठवून आम्ही दोन दिवस बऱ्याचदा हसलो.

दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही गंगानगरला सुखरूप पोहचलो, आणि दोन दिवसांनी लग्न आटोपून मुंबईला परतलो फक्त एक गोष्ट जाणवली कि आपण इतर राज्यांपेक्षा महाराष्टात बरेच सुरक्षित आहोत. आणि का कोणास ठाऊक पण महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी मी तरी लगेच तयार नाही होत.   

एक तास कॉलेज बरोबर

तो जूनचा दुसरा आठवडा असावा, कॉलेजवर जाऊन निवांत आणि ते ही एकांतात बसावं असं ठरवूनच संध्याकाळी चारच्या सुमारास  घरातून बाहेर पडलो. वातावरणात गारठा  होता यावेळी पाऊस लवकर सुरु झाला होता त्यामुळे बरीचशी हिरवाई सुद्धा तयार झाली होती, मुळातच आमच्या भागाला निसर्गदत्त देणगी मिळाली असल्याने चांगलं वर्णन करण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या. बाजूला असणारे डोंगर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे  आणि अधूनमधून दिसणारी शेती, छोटे छोटे पाट आणि त्यातून खळाळणार पाणी,  घरापसुन विसेक मिनिटांच्या अंतरावर एका टेकडीवर कॉलेजचा परिसर आहे. कॉलेज पूर्ण होऊन जवळपास तेरा वर्षे उलटली होती त्यामुळे तिथल्या परिसरात काय काय बदल झाले असतील याविषयी मनात खूप उत्सुकता होती. पण एक दुख: पण वाटत होत कि आपले मित्र, मैत्रिणी कोणी कोणीच भेटणार नाही. पण तरीही चालत राहिलो आणि काही वेळाने टेकडी चढून गेल्यावर मोठ्या पटांगणातून पुढे गेल्यावर कॉलेजच मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पोहचलो.

प्रवेशद्वार अलीकडेच बनवल्यासारख वाटत होत, तो रविवार असल्यामुळे गेट बंदच होत पण एका बाजूने आत जाता येईल एवढी जागा होती तिथून आंत शिरलो डाव्या बाजूलाच ग्रंथालय आणि बास्केट बॉलच एक मैदान आहे, पहिल्यांदा तिकडेच वळलो कारण जुनी सवयच होती तशी त्याबाजूचा परिसर मला आवडायचा. ग्रंथालयाच्या बाहेर चार पाच पायऱ्या होत्या ती आमची हमखास बसायची जागा होती तिथेच बसलो आणि लगेच कॉलेजचे दिवस डोळ्यांपुढे येऊ लागले. पाच वर्षे ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचं एक एक करून चित्र डोळ्यांसमोर उभ राहू लागले.आमचा मुल आणि मुली मिळून असा एक ग्रुप होता सगळेजण मिळून शक्यतो  बास्केट बॉलच्या मैदानाजवळ एका झाडाखाली आम्ही बसत असू ते झाड आणि तिथली जागा होती तशीच दिसत होती, बाजूला फक्त काही इंग्लिश आणि मराठी मध्ये पाट्या लावल्या होत्या फळझाडे किवा फुले कोणी तोडू नये म्हणून आणि काही नवीन फुल झाडे पण तिथे लावली होती. तिथेच कम्पाउंड बाहेर एक छोटेस हॉटेल होत ते आता बंद झाल असाव आणि जवळच पटांगणात मोठ क्यनटीन उभारल होत, पूर्वी असणारे शेड सुद्धा गायब झाले होते. बाजूला तीन नव्या इमारती दिमाखात उभ्या होत्या. तिथे अजून एक पटांगण होत जवळपास सत्तर टक्के परिसर पूर्ण बदलून गेला होता. आमच्या वेळचे बरेचसे प्राध्यापक प्राध्यापिका रिटायर्ड झाल्या होत्या. त्यामुळे ओळखीचे मोजकेच लोक राहिले होते.      

बास्केट बॉल च्या मैदानापासून थोड्या अंतरावर कॉलेजची मुख्य इमारत आहे. तिथेच आमचा शेवटच्या वर्षांचा क्लास भरत असे,  माझा मोर्चा मी तिकडे वळवला आणि इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो, जिथे आम्ही शेवटच्या वर्षातली मैत्री,अभ्यास सर्व काही अनुभवलं होत, सर्व वर्ग बंद होते अख्ख्या कॉलेजमध्ये कोणी नव्हते. वातावरणात एक खूप शांतता होती, वाऱ्याचा मध्यम घोंगावणारा आवाज येत होता क्लास समोर थोडा वेळ थांबलो आणि सर्व  जुन्या आठवणी अजूनच ताज्या झाल्या, क्लासच्या मागच्या खिडकीतून म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला दीड - दोन किलोमीटरवर एक नदी आहे ती  खिडकीतून पाहायला मला खूप आवडायची पावसाळ्यात त्या नदी जवळचा परिसर खूपच सुंदर दिसतो खूपवेळा तो सुंदर नजारा मनामध्ये साठवून ठेवला होता, इतका कि सहज आठवण काढावी आणि डोळ्यासमोर चित्र उभे राहावे. खिडकीजवळून येणारा सोसाट्याचा वारा आणि पाऊस अगदी शब्दात न सांगता येण्यासारखं दृश्य असायचं ते.
   
पण हे सर्व कुठेतरी हरवलं होत ते मित्र सुद्धा हरवले होते आपआपल्या मार्गस्थ झाले होते, मी हि त्यांच्यापैकीच होतो. फरक एवढाच होता कि पुढे जाताना कॉलेज आणि त्या मित्रांचा विसर पडू दिला नव्हता म्हणून थोड्या वेळासाठी का होईना जुन्या आठवणीत रमण्यासाठी मी पुन्हा इथे आलो होतो. कॉलेज संपता संपता दरवर्षी न चुकता भेटायचं अस ठरवलं होत पण तस काहीच झाल नाही. मग माझ्या मनात काही प्रश्न आले कि जे मित्र विसरले ते अशा कोणत्या मोठ्या यशाच्या मागे धावत असतील आणि तसं असेल तर खरच त्यांना काही गवसलं असेल का ? त्यांना सुद्धा आपली आठवण होत असेल का?  आणि हे जवळपास सर्वच कॉलेजच्या मित्र - मैत्रीनीन बद्दल घडत असेल का? मनात आलेले बरेच प्रश्न झटकले आणि गेटच्या दिशेने चालू लागलो, पुन्हा वारंवार कॉलेजची भेट होणारच होती फक्त दिवस आणि वेळ पक्की नव्हती.